ईदच्या आनंदात गरजू विद्यार्थ्यांना सायकलींची भेट

41 गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटप; जमीर खान यांचा उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांनी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. या आनंदोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत आमेर बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते जमीर खान यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबविला. मोमीनपुरा येथे आयोजित कार्यक्रमात 41 विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले.

गरीब परिस्थितीत शिक्षण घेताना अनेक विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन जमीर खान यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देण्यासाठी सायकलींची मदत केली. सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ व श्रम वाचणार असून, त्याचा उपयोग अभ्यासासाठी करता येणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नवीन सायकल हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे खरे फलित ठरले. ईदचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद आणि शिक्षणाची नवी वाट निर्माण करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला आहे. जमीर खान यांनी पुढील वर्षी 100 गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

जमीर खान यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. “ईदची खरी मिठास माणुसकीतच आहे” हा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचला आहे.

Comments are closed.