अखेर 21 वर्षांनंतर उकणी–वणी बससेवा सुरू; ग्रामस्थांचा जल्लोष
संजय खाडे यांच्या पाठपुराव्याला यश; विद्यार्थ्यांना मिळाली प्रवासाची सोय
बहुगुणी डेस्क, वणी: उकणी गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची तब्बल 21 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गेल्या 21 वर्षांपासून बंद असलेली उकणी-वणी बससेवा मंगळवारी, 1 ऑगस्ट रोजी सकाळी सुरू झाली. बस गावात दाखल होताच विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी जल्लोष करत चालक व वाहकांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत केले. या बससेवेसाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले.
गेल्या 21 वर्षांपासून उकणी गावाला नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. उकणीमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी वणी येथे येतात. तसेच बाजारपेठ, कार्यालयीन कामे, आरोग्यसेवा, नोकरी व व्यवसायासाठी नागरिकांना वणी शहरात यावे लागते. अनेकांना नागपूर, यवतमाळला जाण्यासाठी आधी वणीला यावे लागत होते. बससेवा नसल्यामुळे नागरिकांना ऑटो, दुचाकी किंवा अन्य पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते.
बस गावात दाखल होताच जल्लोष
मंगळवारी सकाळी सुमारे 6.15 वाजता उकणी-वणी बस गावात दाखल झाली. बसच्या स्वागतासाठी उकणीसह परिसरातील गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चालक व वाहकांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. त्यानंतर सकाळी 6.30 वाजता बस वणीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांसोबत बसने प्रवास करत नव्या बससेवेचा अनुभव घेतला. ही बस दुपारी 12.30 वाजता विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना घेऊन उकणी येथे परतणार आहे. या बससेवेचा लाभ उकणी, जुनाडा, पिंपळगाव, बोरगाव, भालर वसाहत आणि भालर येथील विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांना होणार आहे.
21 वर्षांनंतर बससेवा मिळणे ही आनंदाची बाब
“उकणीसारख्या गावाला 21 वर्षांनंतर बससेवेचा लाभ मिळवून देणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, महिलांना आर्थिक कामांसाठी आणि ग्रामस्थांना दैनंदिन गरजांसाठी आता सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. हा प्रयत्न गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाला. उकणीवासीयांच्या चेहऱ्यावरचा आनंदच माझ्यासाठी खरी प्रेरणा आहे.”
— संजय खाडे, प्रदेश सचिव, काँग्रेस

उकणी–वणी बससेवेच्या शुभारंभाने ग्रामस्थांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास, महिलांची आर्थिक सोय आणि ग्रामस्थांची दैनंदिन गरज यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. संघर्ष, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि जनतेच्या सहकार्यामुळेच हा ऐतिहासिक दिवस शक्य झाला. आता या बससेवेच्या चाकांवर उकणीवासीयांच्या आशा, अपेक्षा आणि आनंदाची नवी वाटचाल सुरू झाली आहे.


Comments are closed.