परमडोह ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर संशयाची छाया
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर खासदारांनी घेतली जिल्हा परिषद प्रशासनाची भेट
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील परमडोह ग्रामपंचायतीमध्ये 2021 ते 2026 या कालावधीत 15 वा वित्त आयोग, सामान्य फंड तसेच जल जीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही विकासकामे निकृष्ट दर्जाची झाल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानंतर सोमवारी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन जिल्हा परिषद कार्यालय, यवतमाळ येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज म्हेत्रे यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करून परमडोह ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या सर्व विकासकामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
2021 ते 2026 या कालावधीत 15 वा वित्त आयोग, सामान्य फंड आणि जल जीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. तसेच काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने शासकीय निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या संपूर्ण विकासकामांची चौकशी करून त्यामध्ये अनियमितता अथवा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला देण्यात यावेत, अशीही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
ग्रामस्थांच्या तक्रारीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याने आता या प्रकरणाच्या चौकशीकडे परमडोह येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments are closed.