दिवाळीची भेट! अतिक्रमणधारकांना मिळाले जागेचे पट्टे
आमदार संजय देरकर यांच्या दोन वर्षांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
पुरुषोत्तम नवघरे, वणी : वणी नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणधारकांना दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हक्काच्या जागेचे पट्टे वितरित करण्यात आले. गेल्या 2 वर्षांपासून या प्रश्नासाठी आमदार संजय देरकर यांनी विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आवाज उठवत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, पट्टे वितरणामुळे अनेक कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या प्रक्रियेत समितीचे सचिव तथा उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यांच्या समन्वयातून पट्टे वितरणाची प्रक्रिया पूर्णत्वास गेली.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे, नगराध्यक्ष विद्या आत्राम, उपनगराध्यक्ष राकेश बुगेवार, शिवसेना गटनेते सुधीर थेरे, नगरसेवक अजय धोबे, गुलाम रंगरेज, शत्रुघ्न मालेकर, अनिकेत बदखल यांच्यासह किसन खुंगर, सचिन मेश्राम, शेषराज मडावी, गजानन असुटकर, शरद खापणे, सुरेश पाचभाई, पंकज न्याहारे, अनंत गोवर्धन, भास्कर राऊत, सुमित हेपट, दिलदार शेख, उमर शरीफ, नगरपरिषदेचे कर्मचारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, शहरातील काही राखीव क्षेत्रांमध्ये वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांच्याही समस्या आमदार संजय देरकर यांच्या निदर्शनास आहेत. या नागरिकांनाही न्याय मिळवून देण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
अतिक्रमणधारकांना हक्काचे पट्टे मिळणे ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून, अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या जागेची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबांसाठी दिलासा देणारी बाब आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न यापुढेही सुरू राहील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.


Comments are closed.