दुर्गम पाड्यांवर माणुसकीचा दीपोत्सव; स्माईल फाउंडेशनचा पुढाकार

संघर्ष करणाऱ्या महिलांना लोकसहभागातून 2,500 हून अधिक साड्यांची भेट

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि नव्या आशेचा उत्सव. मात्र, काही घरांमध्ये परिस्थितीच्या अंधाराने हा आनंद हिरावून घेतलेला असतो. शेतकरी आत्महत्येमुळे पतीचे छत्र हरवलेल्या विधवा महिला आणि आर्थिक परिस्थितीशी झुंज देणाऱ्या गोरगरीब महिलांच्या आयुष्यातही सणासुदीचा आनंद अनेकदा मर्यादित राहतो. अशाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील विधवा महिला तसेच गरजू आणि गोरगरीब महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी स्माईल फाउंडेशनने माणुसकीचा हात पुढे केला. दुर्गम पाड्यांवर पोहोचत संस्थेने या महिलांना केवळ साड्यांची भेट दिली नाही, तर त्यांच्या संघर्षाला सन्मानाची आणि आपुलकीची ऊब दिली.

‘एक साडी त्या संघर्ष करणाऱ्या स्त्रीसाठी’ या भावस्पर्शी अभियानातून स्माईल फाउंडेशनने यंदा सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श निर्माण केला. 13 नोव्हेंबर रोजी मारेगाव तालुक्यातील सोनूपोड, गावपोड, सालईपोड, बुरकीपोड आणि जानकाईपोड या दुर्गम पाड्यांवर हा उपक्रम राबविण्यात आला. दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चाललेल्या या अभियानात सुमारे 800 महिलांना 2,500 हून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामागे उभा राहिलेला लोकसहभाग. गेल्या महिनाभरापासून संस्थेच्या सदस्यांनी समाजातील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी चांगल्या स्थितीतील साड्या भेट दिल्या, तर काही दानशूर नागरिकांनी नव्या साड्यांचीही भर घातली. अशा प्रकारे समाजातील संवेदनशील हातांनी एकत्र येत या अभियानाला व्यापक स्वरूप दिले.

केवळ साडीची भेट नव्हे, तर संघर्षाचा सन्मान!
शेतकरी आत्महत्येमुळे पतीचे छत्र हरवलेल्या विधवा महिला तसेच आर्थिक परिस्थितीशी झुंज देणाऱ्या गोरगरीब महिलांचा संघर्ष हा केवळ आर्थिक नसतो. त्यात मुलांचे संगोपन, संसाराचा गाडा, सामाजिक परिस्थिती आणि भविष्याची चिंता अशा अनेक आघाड्यांचा समावेश असतो. या महिलांच्या संघर्षाची जाणीव ठेवून शहरापासून दूर असलेल्या दुर्गम पाड्यांवर पोहोचण्याचा स्माईल फाउंडेशनचा प्रयत्न विशेष ठरला. एखाद्या महिलेला साडी देणे हा या उपक्रमाचा केवळ एक भाग असला, तरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील विधवा महिला आणि गरजू गोरगरीब महिलांच्या अस्तित्वाची दखल घेणे, त्यांच्या संघर्षाप्रती आदर व्यक्त करणे आणि त्या एकट्या नाहीत, ही जाणीव करून देणे हाच या उपक्रमामागील खरा उद्देश आहे. – सागर जाधव, स्माईल फाउंडेशन

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त रमेश बोबडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पियुष आत्राम, सचिव आदर्श दाढे, विश्वास सुंदरानी, सिद्धार्थ साठे, ज्योती नगरवाला, वसंती ठक्कर, पुष्पा जाधव आणि अनिकेत वासरीकर यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते. समाजसेवेचा खरा अर्थ केवळ मदतीचा हात देण्यात नसतो, तर दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवून त्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यात असतो. स्माईल फाउंडेशनच्या या उपक्रमाने हीच भावना प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त केली. दिव्यांच्या रोषणाईपलीकडे जाऊन माणुसकीचा प्रकाश पाड्यापाड्यांवर पोहोचविणाऱ्या या अभियानाने सामाजिक दिवाळीचा अर्थ अधिक व्यापक केला.

Comments are closed.