धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या व शैक्षणिक साहित्याचं वाटप
शाळेत रंगला डॉ. लोढा यांचा क्लास...
विवेक तोटेवार, वणी: केवळ डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक होणे किंवा एखादी लठ्ठ पगाराची नोकरी मिळवणे हेच शिक्षणाचे महत्त्व नाही तर एक शिक्षण आपल्याला एक माणूस बनवते. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपल्याला काही देणं आहे. समाजाचं आपल्यावर असलेलं ऋण आपण फेडलं तरच त्या शिक्षणाला महत्त्व आहे. असे प्रतिपादन डॉ. महेंद्र लोढा यांनी केलं. सोमवारी वणीतील आदर्श हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकर व साधनाताई गोहोकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ आणि जिद्द आहे. मात्र आज वाढलेली महागाई यामुळे वही घेणे जमत नाही. त्यामुळे अशा मुलांना शैक्षणिक मदत व्हावी हा उद्देश ठेवून विरोधी पक्षनेते नंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 100 गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
शाळेत रंगला डॉ. महेंद्र लोढा यांचा क्लास
यावेळी डॉ. लोढा यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. बालपणी ते कसे होते व पुढे डॉक्टर झाल्यानंतर त्यांच्यात काय बदल झाला याचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी चिमुकल्यांपुढे उलगडून दाखवला. मुलं देखील त्यांच्या क्लासमध्ये चांगलेच रंगले. काहीही परिस्थिती आली तरी शिक्षण मध्ये सोडू नये असं आवाहन त्यांनी करत भविष्यात शिक्षणात कोणताही व्यत्यय आला, कोणतीही शैक्षणिक गरज भासली तर तुमचा या मोठ्या मित्राला, भावाला विसरू नका असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकर म्हणाले की शिक्षण केवळ औपचारिकते पुरते नसून विविध कला, विद्या, व्यावसायिक कौशल्ये इत्यादी विषयही ज्ञानाच्या कक्षेत येतात. शिक्षणासोबतच कला, खेळ, व्यावसायिक कौशल्य याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. तुमच्यातला उद्या एखादा मोठा कलाकार, साहित्यिक, ऍथलिट झाला तर याचा आम्हा सर्वांनाच आनंद होईल. यापुढेही मुलांना शिक्षणासाठी अडचण येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाला डॉ. महेंद्र लोढा, जयसिंगजी गोहोकर, साधनाताई गोहोकर, राजाभाऊ बिलोरीया, प्रा. रविंद्र मत्ते, यांच्या सह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.