विलास ताजने, वणी: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन वर्षात केबल सेवेविषयी नवीन नियम लागू केले आहे. त्याअनुषंगाने केवळ पसंतीच्या वाहिनीचेच शुल्क भरून सेवा प्राप्त करा, अशा प्रकारची जाहिरात सुरू आहे. मात्र ही केवळ ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे केबल चालकांचे मत आहे. सदर नियमावलीने केबल चालकांचा धंदा धोक्यात येण्याची शक्यता केबल चालकात निर्माण झाली आहे.
म्हणून या नियमावलीला विरोध दाखविण्यासाठी दि. २७ गुरुवारी रात्री सात ते दहा वाजेपर्यंत केबल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी आज प्रेक्षकांना आपल्या आवडीच्या मालिका पाहता येणार नाही. टीव्ही सुरू करताच दिसणार तो केवळ मुंगीडान्स मुंगीडान्स. ट्रायच्या नवीन नियमानुसार १३० रुपयांत शंभर विनाशुल्क चॅनेल्स (वाहिनी) पहायला मिळणार आहे. तर त्यापुढे प्रत्येक वाहिनीवर ठराविक दरानुसार पैसे मोजावे लागणार आहे.
सध्या २०० ते ३०० रुपयांपर्यंत ग्राहकांना पुष्कळ चॅनेल्स बघायला मिळत आहे. परंतु नवीन नियमानुसार अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याचे केबल चालकांचे मत आहे. केबल चालकांना आता १३० रुपयांपैकी ६५ रुपये मिळणार आहे. तसेच अन्य वाहिन्यांद्वारे केवळ १० टक्केच मिळणार असल्याने केबल व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता केबल चालकांत वर्तविली जात आहे. मात्र ट्राय आणि केबल चालकांच्या वादात टिव्ही प्रेक्षक गोंधळात पडलेले आहेत. कोण खरं आणि कोण खोटं हे सध्यातरी कळेनासं झालं आहे.