शेतातील बंड्याला आग लागून लाखोंचे नुकसान, महाकालपूर शिवारातील घटना

शेतक-यांची ससेहोलपट थांबता थांबेना

0
60

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील महाकालपूर येथील एका शेतक-याच्या बंड्याला भीषण आग लागली. आज शनिवारी दिनांक 17 मार्च ला पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या आगीत शेतमालासह जनावरांचा चारा जळाल्याची माहिती आहे. यावर्षी कापसाला अपेक्षीत भाव नसल्याने शेतक-यांनी घरात किंवा बंड्यात कापूस साठवून ठेवला आहे. त्यामुळे कापूस चोरीच्या घटना समोर येत असताना आता बंड्याला आग लागल्याची घटना देखील समोर आली आहे.

सविस्तर वृत्त असे की कायर रोडवर महाकालपूर हे गाव आहे. या गावात वामन यादव बोन्डे राहतात. त्यांची महाकालपूर शिवारात त्यांच्या मालकीची शेती आहे. तर काही शेती ते ठेक्याने करतात. सध्या त्यांच्या शेतातील बंड्यात शेतमाल साठवून ठेवलेला आहे. यात कापूस, तूर, हरभरा यासह जनावरांचा चारा देखील आहे.

आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास वामन हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना शेतातील बंड्याला आग लागल्याचे आढळून आले. त्यांनी लगेच याची माहिती मोबाईलवरून गावीतील परिचितांना देत गावातील लोकांना बोलावून घेतले. गावक-यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. यात कापसाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या आगीत शेतक-याचे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

शेतक-यांची ससेहोलपट थांबता थांबेना
या वर्षी कापसाला अपेक्षीत भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतक-यांनी कापूस घरात किंवा बंड्यात साठवून ठेवला आहे. घरी कापूस साठवून ठेवल्याने खाज सुटण्याचा त्रास शेतक-यांच्या कुटुंबीयांना सोसावा लागत आहे. तर शेतातील बंड्यात, गोठ्यात ठेवलेला कापूस चोरी जाण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातच आता बंड्याला आग लागल्याची घटना देखील समोर आली आहे. आज ना उद्या कापसाचा भाव वाढेल या आशेने शेतकरी आहे. मात्र भाव वाढण्याऐवजी विविध समस्येला शेतक-यांना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे शेतमालाच्या भावासाठी झगडताना दुसरीकडे शेतमालाच्या नुकसानीच्या घटनांमुळे शेतक-यांची ससेहोलपट होताना दिसत आहे. 

Relief Physiotherapy clinic
Previous articleकाम आणि कुटुंबाचा ताळमेळ बसविणाऱ्या नारीशक्तीचा केला सन्मान
Next articleशौचास जाण्याचे कारण सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...