दीपक चौपाटी जवळील सॉमिलला भीषण आग
मध्यरात्रीची घटना, लाखोंचे लाकूड, फर्निचर जळून खाक
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या भगवान सॉ मिलला मध्यरात्री भीषण आग लागली. 3 ते 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग इतकी भीषण होती की दूरवर या आगीचे लोंढे पोहोचत होते व आग आटोक्यात आणल्यानंतरही सकाळी उशिरा पर्यंत ही आग धुमसत होती. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दुकान मालकाचे लाखोंचे फर्निचर, प्लायवूड, सननाईक, दरवाजे, लाकडी वस्तू इ. जळून खाक झाल्या आहेत. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दीपक टॉकीज चौपाटी परिसरात चिकनच्या दुकानाच्या पुढे भगवान सॉमिल (लाकूड कटाई) नावाने लाकडाचा टाल आहे. यात विविध फर्निचर बनवणे, दरवाजे, खिडकी, लाकूड कटाई इत्यादी काम केले जाते. तर समोरच्या बाजूला हार्डवेअरचे दुकान आहे. यात प्लायवूड, सनमाईक व इतर वस्तूंची विक्री होते. दुकानाच्या मागच्या बाजूला लागडाचा भुसा ठेवला आहे.
गुरुवारी दिनांक 6 जूनच्या मध्यरात्री (शुक्रवार) 1.30 वाजताच्या सुमारास टालाच्या मागील बाजूने शेजा-यांना धुर येताना दिसला. त्यामुळे शेजारी तातडीने चौकीदाराला याची विचारपूस करण्यासाठी गेले. आग लागल्याचे कळताच चौकीदाराने याची माहिती दुकान मालकाला दिली. मात्र या दरम्यान आगीने रौद्ररूप धारण केले.
घटनास्थळी लोकांची जत्रा
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास लागल्याची वार्ता परिसरात पसरली. रिमझिम पाऊस असतानाही आगीची माहिती मिळताच शेकडो लोक या ठिकाणी गोळा झाले. काही वेळाने अग्निशामन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली. आग आटोक्यात येत नसल्याने वेकोलिची गाडी देखील बोलवण्यात आली. परिसरातील नागरिकांनी मदतकार्यात हातभार लावला.
गेल्या वर्षीच नुतनीकरण
भगवान सॉमिल ही शहरातील एक जुना लाकडाचा टाल आहे. सुरुवातीला केवळ लाकूड कटाईचे काम या ठिकाणी व्हायचे. कालांतराने फर्निचर, दरवाजे, खिडक्या इत्यादींचे कामे देखील या ठिकाणी सुरु झाले. टालाच्या समोरच हार्डवेअरचे दुकान होते. यात प्लायवूड, ग्लास, सनमाईक इत्यादींची विक्री व्हायची. व्यवसायाचा व्याप वाढत चालल्याने गेल्या वर्षीच या दुकानाचे नुतनीकरण करण्यात आले होते. नुतनीकरणात टिनाचे शेड केल्याने ही आग बाहेर आली नाही व त्यामुळे शेजारील घरात आग पसरली नाही.
आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. आग विझवण्यात अग्निशामक दलाचे देविदास जाधव, दीपक वाघमारे, सौरभ पानघाटे, रितेश गौतम, निवृत्त कर्मचारी शाम तांबे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मदत केली.
Comments are closed.