पुरूषोत्तम नवघरे, वणी : सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई आणि वर्षानुवर्षे फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याची मोहीम शिरपूर पोलिसांनी तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत कुरई येथील कुख्यात गुन्हेगार शेख आशिक उर्फ ‘तोत्या’ याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली, तर 2013 मधील गुन्ह्यात गेल्या 13 वर्षांपासून फरार असलेल्या सलमान खान याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या दुहेरी कारवाईने गुन्हेगारांविरुद्धची मोहीम अधोरेखित झाली आहे.
सराईत गुन्हेगार ‘तोत्या’ दोन तालुक्यांतून तडीपार
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरई येथील शेख आशिक उर्फ तोत्या शेख इब्राहीम (वय 35) हा चोरी, घरफोडी आणि अवैध दारूविक्रीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांची नोंद आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने त्याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली. त्याला वणी आणि मारेगाव या दोन तालुक्यांच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.
13 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा;
दुसऱ्या कारवाईत, 2013 मध्ये निलजई (डब्ल्यूसीएल) परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपी सलमान खान समशाद खान पठाण (वय 35, रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या तपासादरम्यान पोस्टल विभागाची मदत आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील सैनी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शिरपूरचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक गुल्हाणे, पोलीस हवालदार सुनील दुबे व अजय वाभिटकर, पोलीस शिपाई किरण दासरवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे आणि होमगार्ड मोहन घागी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


Comments are closed.