वणीत तीन हॉटेलवर छापे; 66 किलो संशयित गोमांस जप्त

पाच हॉटेलची तपासणी, तीन ठिकाणी मांस आढळले; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

बहुगुणी डेस्क, वणी : शहरात गोवंशीय मांसाची विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने पाच हॉटेलवर छापे टाकले. या कारवाईत तीन हॉटेलमध्ये संशयित गोवंशीय मांस आढळून आले. पोलिसांनी एकूण 66 किलो मांस जप्त केले असून, त्याची अंदाजे किंमत 19,800 रुपये आहे. या प्रकरणी तीन हॉटेलचालकांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 18 ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित हॉटेलची तपासणी करण्यात आली.

टॉकीजसमोरील हॉटेलमध्ये 38 किलो मांस
पोलिसांनी सुजाता टॉकीजसमोरील हॉटेल मदिना येथे छापा टाकला. यावेळी हॉटेलच्या फ्रिजमध्ये 18 किलो कच्चे मांस, तर प्लास्टिकच्या टोपलीत 20 किलो मांस आढळले. एकूण 38 किलो मांस जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत 11,400 रुपये आहे. या प्रकरणी हॉटेलचालक हबीब खान बिस्मिल्ला खान (वय 53, रा. साई नगरी, वणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सुलतान बिर्याणी हॉटेलमधून 9 किलो मांस जप्त
एकता नगर परिसरातील सुलतान बिर्याणी हॉटेलमध्ये केलेल्या कारवाईत किचनमध्ये 5 किलो कच्चे मांस, तर कुकरमध्ये 4 किलो शिजवलेले मांस आढळले. पोलिसांनी एकूण 9 किलो मांस जप्त केले. त्याची अंदाजे किंमत 2,700 रुपये आहे. या प्रकरणी हॉटेलचालक मोहम्मद सिद्दीक हाजी हबीब रंगरेज (वय 47, रा. बिर्याणी टॉकीजजवळ, वणी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ताज बिर्याणी हॉटेलमध्ये 19 किलो मांस
एकता नगरातील ताज बिर्याणी हॉटेलमध्येही पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 19 किलो संशयित गोवंशीय मांस आढळले. त्याची अंदाजे किंमत 5,700 रुपये आहे. या प्रकरणी हॉटेलचालक साजिद खान शमशेर खान (वय 49, रा. मदिना ताजजवळ, वणी) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी
कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मांसाचे पंचनामे करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रयोगशाळेतील तपासणीसाठी नमुने घेण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. नाशवंत मांसाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी वणी नगरपरिषदेचे सहकार्य घेण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, गजानन राजमल्लू, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

Comments are closed.