आज कोरोनाचे 13 रुग्ण, कन्टेन्मेंट झोनबाहेर जाऊन नागरिकांचा मुक्त संचार

कोरोनाबाबत अफवा व गैरसमज पसरवणा-यांवर होणार गुन्हा दाखल

0

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 13 रुग्ण आढळून आले. आज आलेल्या रुग्णांमध्ये 5 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 8 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आजच्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 473 झाली आहे. दरम्यान शहरात जनता कर्फ्यू लावला जाणार नाही असे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्पष्ट केले. याशिवाय कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालय परिसरातील ट्रामा केअर सेंटर येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचालीला वेग आहे. कन्टेन्मेंट झोनमधून नागरिकांचा बाहेर मुक्त संचार होत असल्याच्या तक्रारी वाढत असून प्रगती नगर येथील कन्टेन्मेंट झोनसाठी लावण्यात आलेले बांबू तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याशिवाय कन्टेन्मेंट झोनच्या बाहेर सुरक्षा रक्षक नसल्याने रहिवाशांचा बाहेर मुक्तसंचार होत असल्याचा आरोपही विविध परिसरातून होत आहे. शहरात कोरोनाबाबत फेक मॅसेज पसरवून गैरसमज पसरवला जात असल्याने फेक मॅसेज व गैरसमज पसरवणा-या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी यांनी स्पष्ट केले.

आज यवतमाळहून 25 अहवाल प्राप्त झाले. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 20 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. याशिवाय आज 15 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 8 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 7 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 27 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 122 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात 473 पॉजिटिव्ह व्यक्ती झाल्यात. यातील 294 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 168 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या 10 झाली आहे.

टिळकनगरमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण
आज आलेल्या रुग्णांमध्ये टिळकनगर येथे 3 तर साने गुरुजी नगर, आरएच कॉर्टर, राजूर, देशमुखवाडी, चिखलगाव, टागोर चौक, सिंधी कॉलनी, जैताई मंदिर जवळ, विराणी टॉकीज परिसर, विठ्ठलवाडी इत्यादी परिसरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.

आज 4 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 4 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 168 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 74 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 95 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 16 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 85 व्यक्ती भरती आहेत.

ट्रामा केअर सेंटरमध्ये नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी हालचाली
कल्याण मंडपम येथे आयोजित बैठकीत ट्रामा केअर सेंटरच्या जागेत कोविड केअर सेंटर येथे तयार करावे या मागणीने जोर धरला होता. अधिकाधिक व्यक्तींनी याबाबत सूचना केली होती. त्यावर आता विचार केला जात असून तिथे कोविड केअर सेंटर सुरू होऊ शकते का? याची चाचपणी केली जात आहे. याबाबत मंगळवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

अफवा पसवणा-यांवर गुन्हे दाखल करणार
सोशल मीडियात सध्या कोरोनाविषयक अफवांना प्रचंड पीक आले आहे. कोरोना हे एक षडयंत्र आहे, प्रत्येक रुग्णासाठी प्रशासनाला एक ते दीड लाख रुपये मिळतात, अवयव काढून विक्री करतात, कोरोना असा कोणता आजारच नाही, रुग्ण घरीच आपोआप बरा होतो, टेस्ट केल्यावर कोरोना नसेल तरी पॉजिटिव्ह येते, असे एक नव्हे तर अनेक मॅजेस तालुक्यात सोशल मीडियावरून पसरत आहे. परिसरात असे मॅसेज गैरसमज वाढण्यास कारणीभूत आहे. मात्र त्याहीपुढे जात लोक अशा अफवांवर विश्वास ठेऊन निदान आणि उपचार टाळत टाळत आहे. यात रुग्णसंख्या वाढण्याचा धोका असतो, शिवाय रुग्णाचा आजार वाढल्यास प्रसंगी जीवही जाऊ शकतो. त्यामुळे अशा अफवा पसरवणा-यांविरोधात प्रशासनाने आता कठोर पावलं उचलले आहे. कोरोनासंदर्भात अफवा किंवा गैरसमज पसरवत असल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली. यासाठी सायबर क्राईमची मदत देखील घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कन्टेन्मेंट झोनबाहेर जाऊन नागरिकांचा मुक्त संचार -एकता नगर
कन्टेन्मेंट झोनसाठी लावण्यात आलेले बांबू नागरिकांनी तोडले – प्रगती नगर

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.