आज कोरोनाचे 4 रुग्ण, दिडशेचा आकडा क्रॉस

सावधान वणीकरांनो.... ! कोरोनाची कम्युनिटी स्प्रेडिंगकडे वाटचाल?

0

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी वणीमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आले आहेत. हे चारही रुग्ण साने गुरूजी नगर जैन ले आउट येथील आहेत. काल 17 रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 148 झाली होती. आज रुग्णसंख्येने दिडशेचा आकडा पार करून हा आकडा 152 झाला आहे. यासह काल रात्री सावंगी (मेघे) येथे उपचारासाठी गेलेला सावंगी (नायगाव) येथील एक तरुण पॉजिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाची आज आलेल्या आकड्यांमध्ये नोंद नाही.

सध्या तालुक्यात 152 पॉजिटिव्ह रुग्ण असून यातील 59 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 91 व्यक्ती पॉजिटिव्ह आहेत. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आज रॅपिड ऍन्टिजन टेस्टद्वारा करण्यात आलेल्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. तर आज 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. हे रिपोर्ट उद्या किंवा परवा येण्याची शक्यता आहे.

परिसरात कम्युनिटी स्प्रेडिंगची भीती?
गेल्या आठवड्यापासून वणीत कोरोनाचे रुग्ण अचानक झपाट्याने वाढत आहे. यातील अनेक व्यक्तींमध्ये कोरोनाचे लक्षणं नाहीत तर अनेक व्यक्ती कोणत्याही पॉजिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात न आल्याने पॉजिटिव्ह निघाले आहेत. जेव्हा रुग्णांचा सोर्स आढळून येत नाही व अचानक झपाट्याने रुग्णसंख्या वाढू लागते. अशा वेळी त्याला कम्युनिटी स्प्रेडिंग म्हटलं जातं.

सध्या कम्युनिटी स्प्रेडिंगबाबत प्रशासनाकडून कोणतेही सुतोवाच करण्यात आले नसले तरी वणीत अचानक झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने कम्युनिटी स्प्रेडिंगकडे वाटचाल तर नाही अशी भीती निर्माण झाली आहे. याबाबत वणी बहुगुणीने एका खासगी डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी कम्युनिटी स्प्रेडिंगची सध्या नसली तरी त्याकडे वाटचाल सुरू असल्याचे सध्याचे रुग्णसंख्येवरून दिसून येत असल्याचे सांगितले. शिवाय सतत ताप असणा-या रुग्णांना कोविडची टेस्ट करण्यास पाठवले असता त्यातील अधिकाधिक व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे शहरवासीयांनी आता अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविड केअर सेन्टर परसोडा

कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तसेच सध्या परसोडा येथे असलेल्या कोविड केअर सेन्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा सातत्याने आरोप होत असल्याने प्रशासनाने दुस-या कोविड केअर सेन्टरबाबत चाचपणी करण्यास सुरूवात केली होती. यासाठी नांदेपेरा रोडवरील एक शाळा व वरोरा रोड येथील एका कॉलेजमध्ये यासह इतरही ठिकाणाबाबत चर्चा झाली होती. याबाबत निर्णय झाला असून वागदरा रोडवरील अपंग निवासी शाळा येथे पर्यायी कोविड केअर सेन्टर सुरू केले जाणार आहे अशी माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

अपंग निवासी शाळा होणार कोविड केअर सेन्टर – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
वणीत रुग्णाचा आकडा वाढल्यानंतर आम्ही खबरदारी म्हणून दुस-या कोविड केअर सेन्टरबाबत बैठक घेऊन याबाबत चर्चा केली होती. मात्र त्यानंतर शहरातील रुग्णसंख्या कमी होऊन केवळ 5-6 व्यक्तीच ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हा विषय़ मागे राहिला. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून आम्ही वागदरा रोडवरील अपंग निवासी शाळा कोविड केअर सेन्टर म्हणून निवडली आहे. यात 40 बेडची व्यवस्था करण्यात  येणार आहे. 
– संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा

Leave A Reply

Your email address will not be published.