वेकोलिच्या खाणीतून डीझेल चोरताना 6 जणांना अटक, शिरपूर पोलिसांची कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलिच्या उकणी खाणीत धाड टाकून पोलिसांनी डोझरमधून डिझेल चोरणा-या सहा जणांना अटक केली. शुक्रवारी दिनांक 24 फेब्रुवारीला रात्री 10 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 140 लीटर डिझेलसह 2 गाड्या असा एकूण 12 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरपूर पोलिसांनी सदर कारवाई केली.

सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी रात्री शिरपूर पोलिसांना उकणी येथील वेकोलिच्या खाणीतून डिझेलची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. यावरून 10 वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक व एसएसएफचे सुरक्षा रक्षक खाण परिसरात गेले. दरम्यान या पथकाला कोल स्टॉक क्रमांक 8 जवळ काही इसम संशयास्पद आढळून आले.

सदर ठिकाणी पथक गेले असता तिथे दोन उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांमध्ये डिझेल भरलेल्या प्लास्टीकच्या कॅन आढळून आल्या. पोलिसांनी चौकशी केली असता डोझरमधून सदर डिझेल काढल्याची माहिती त्यांना मिळाली. आरोपींनी कबुली देताच पोलिसांना 6 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 140 लीटर डिझेल व दोन चारचाकी वाहन असा एकूण 12 लाख 13 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकऱणी प्रफुल्ल बंडूजी राजपूत (29) रा. उकणी, नीलेश वसंत उज्ज्वलकर (36) रा. उकणी, रोहीत सुनील मंगाव (21) रा. बोरगाव, आकाश शंकर खाडे (26) रा. पिंपळगाव, सुमीत बंडुजी वरारकर, रा. भालर, दशरथ कवडू खारकर (24) रा. बोरगाव यांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.