धडाका: वणी शहर व तालुक्यातील रस्त्यांसाठी 53 कोटी मंजूर

विकास कामांसाठी आणखी 200 कोटी आणण्याची आमदारांची ग्वाही

जितेंद्र कोठारी, वणी: येथील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने नवीन सरकार स्थापनेनंतर सुरू झालेल्या पहिल्याच अधिवेशनात वणी शहर व तालुक्यातील रस्ता निर्मिती व दुरुस्तीसाठी 53 कोटी रुपये मंजूर करण्यात यश मिळाले आहे. पुढील एका वर्षात वणी विधानसभा मतदार संघात विकासकामांसाठी आणखी 200 कोटींचा निधी खेचून आणू अशी ग्वाहीही आमदार बोदकुरवार यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना दिली.

चालू अधिवेशनात तालुक्यातील वेळाबाई ते कुरई, ढाकोरी रस्ता, मुकुटबन, पुरड, वेळाबाई ते आबई फाटा रस्ता, उमरी, मेंढोली ते चारगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 30 कोटी मंजूर करण्यात आले आहे. मारेगाव तालुक्यातील खैरी कोसारा रस्ता, कोसारा, खडकी, अडेगाव रस्ता, खैरी करणवाडी मार्ग, मार्डी, चोपण, चनोडा, वनोजा, गौराळा रस्ता व करणवाडी, नवरगाव, गोधणी, बोर्डा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुरवणी बजटमध्ये 23 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार बोदकुरवार यांनी दिली.

यापूर्वी वणी नगर परिषद क्षेत्रातील अंतर्गत रस्ते व भूमिगत नाली बांधकामासाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांच्या कामासाठी 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते साई मंदिर, बस स्टँड, टिळक चौक ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत सिमेंट रस्त्यांसाठी 24 कोटी 58 लाख रुपयांचा काम प्रगती पथावर आहे.

वर्ष 2014 ते 2019 या युती सरकारच्या काळात वणी शहर व मतदार संघात कोट्यवधी रुपयांचे विकास कामे पूर्ण झाले. आमदार बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने वणी शहराचा चेहरा मोहरा बदलला. याच काळात वणी विधानसभा मतदार संघातील चार मुख्य मार्ग वणी कायर ते पुरड, बोरी पाटण ते मुकुटबन, चारगाव, शिरपूर, शिंदोला ते कळमना व कुंभा, मार्डी, नांदेपेरा रस्त्यासाठी केंद्रीय रस्ता विकास निधीतुन तब्बल 225 कोटी रुपयांचे काम मंजूर झाले.

आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात वणी विधानसभा क्षेत्रात विकास कामे ठप्प झाली होती. मात्र आता युती सरकारच्या काळात विकास कामाची गाडी पुन्हा धावणार अशी अपेक्षा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केली.

Comments are closed.