लोटी महाविद्यालयात रंगला माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमिलन सोहळा

निकेश जिलठे, वणी: कॉलेज संपले… कुणी पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेले… कुणी व्यवसायात गुंतले… कुणाचे शेती तर कुणी संसारात रमले… काही विद्यार्थी तर बाहेर गेले आणि नोकरीच्या निमित्ताने तिथेच स्थायिक झाले… मात्र 20 वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांच्यातील मैत्रीचा ओलावा मात्र कायम राहिला… महाविद्यालयात शिकताना एकमेकांशी जुळलेली नाळ तशीच राहावी… सर्वांनी पुन्हा एकदा भेटावे… एकमेकांबाबत जाणून घ्यावे… हितगुज करावे यासाठी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला व लोटी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा रविवारी स्नेहमिलन सोहळा रंगला.

लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात सन 2003-2004 च्या बॅचचे कला शाखा व एनएसएसमध्ये असलेले सुमारे 40 विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचे शिक्षक देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रसाद खानजोडे होते तर प्रा. स्वानंद पुंड, प्रा. दिलीप अलोणे, प्रा. अभीजीत अणे, प्रा. करमसिंग राजपूत यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

गेल्या काही वर्षांपासून लोटी महाविद्यालयातील 2003-04 बॅचचे विद्यार्थी व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. काही विद्यार्थी वणीतच स्थायिक झाले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या. मात्र अनेक मित्र मैत्रिणी हे बाहेरगावी स्थायिक झाले होते. दरम्यान सर्वांनी एकत्र येऊन महाविद्यालयीन आठवणींना उजाळा द्यावा अशी इच्छा अनेकानी व्यक्त केली. शुभलक्ष्मी ढुमे व आरती पिंपळशेंडे या माजी विद्यार्थींनींनी यासाठी पुढाकार घेतला व स्नेहमिलन सोहळ्याची (रियुनियन सेरेमनी) कल्पना पुढे आली. अनेकांना कॉल करून याबाबत माहिती देण्यात आली व रविवारी दिनांक 16 जुलै ही तारीख सोहळ्यासाठी ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली याचा आनंद होत आहे. विद्यार्थी एकत्र येत आहे व आमचीही आठवण ठेवत आहे हे केवळ समाजमाध्यमांमुळे शक्य झाले. या पद्धतीचे रियुनियन व्हायला पाहिजे असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रसाद खानजोडे यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही प्रगती केली असून आज ते विद्यापीठाच्या वेगवेगळ्या समितीवर असल्याचे सांगितले.

सर्व विद्यार्थ्यांना मंचावर बोलवून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थांनी आपला परिचय देत आज ते कुठे कार्यरत आहे याचा थोडक्यात परिचय दिला. त्यानंतर तारेंद्र बोर्डे (माजी नगराध्यक्ष), सचिन तितरे (महसूल अधिकारी), सुहास परेकर (लेखा अधिकारी), सारिका चव्हाण (विधिज्ञ), प्रशांत पाठक (प्राध्यापक) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या वेळी विविध मनोरंजनात्कम कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. लवकरच भेटुया या अभिवचानाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. स्वरुची भोजाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे संचालन अभय पारखी यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपक दिकुंडवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभलक्ष्मी नायगाावकर-ढुमे, आरती पिंपळशेंडे-आसेकर, अतुल डफ, प्रशांत पाठक इत्यादींनी परीश्रम घेतले. या सोहळ्याला वणीसह, नागपूर, अमरावती, वरोरा, आर्णी, गोंदिया, यवतमाळ, पुणे, चंद्रपूर इत्यादी ठिकाणाहून विद्यार्थी आले होते.

Comments are closed.