बहुगुणी डेस्क, वणी: नाईटशिफ्टसाठी पायदळ जात असलेल्या एकाला पाठिमागून येणा-या कारने जबर धडक दिली. या अपघातात धडक बसलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल श्रावण ठेंगणे असे अपघातातील मृताचे नाव आहे. मारेगाव येथील करंजी रोडवरील मीलन बार जवळ शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक पसार झाला. या प्रकरणी कार चालकावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, मृत विठ्ठल श्रावण ठेंगणे (57) हे मारेगाव येथील वार्ड क्रमांक 3 मधील रहिवासी होते. ते मारेगाव येथील अहेफाज जिनिंग येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम काम करायचे. शुक्रवारी दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ते नाईट शिफ्टसाठी जिनिंगमध्ये पायदळ जात होते. दरम्यान करंजी रोडवरील मिलन बारच्या अलीकडे असलेल्या एका रसवंतीजवळ त्यांना मारेगावहून करंजीच्या दिशेने जाणा-या एका भरधाव कारने जबर धडक दिली.
या अपघातात विठ्ठल यांच्या डोक्याला व छातीला गंभीर मार लागला. अपघात होताच घटनास्थळावर नागरिक गोळा झालेत. तर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी अपघाताची माहिती जिनिंगच्या मॅनेजरला व विठ्ठलच्या नातेवाईकांना दिली. पोलीसही अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.
दरम्यान जिनिंगचे मॅनेजर रिक्की हे तिथे तातडीने कार घेऊन पोहोचले. त्यांनी विठ्ठलला कारमध्ये टाकून मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. विठ्ठल यांचे चुलत भाऊ रमेश ठेंगणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात कारचालकाविरोधात बीएएसच्य कलम 281 व 106 (1) व मोटर वाहन कायद्याच्या कलम 134 अ व ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घठनेचा तपास हेड कॉन्स्टेबल आनंद आलचेवार करीत आहे.
Comments are closed.