बहुगुणी डेस्क, वणी: मोटारसायकलने गावी परतताना एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. निंबाळा फाट्याजवळ रात्री 10.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक व मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला आहे. दोघे ही पहापळ येथील रहिवासी असून विजय संभाजी थेरे (वय अंदाजे 35) व नितीन खुशाल पायघन (वय अंदाजे 28) असे जखमींचे नावे आहेत. या दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
विजय व नितीन हे दोघेही पहापळ ता. मारेगाव येथील रहिवासी असून ते शेती करतात. रात्री ते वणीहून पहापळ येथे त्यांच्या हिरो होन्डा एसएस या दुचाकीने जात होते. दरम्यान निंबाळा फाट्याजवळ रुद्राक्ष वनाजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला. दरम्यान मारेगाव येथे जात असलेल्या प्रवाशाला अपघात झाल्याचे कळताच त्याने याची माहिती निंबाळा येथील ग्रामपंचायच सदस्य मनोज ढेंगळे यांना दिली. त्यांनी निंबाळा येथील गजानन विरुडकर या सहका-याला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.
जखमीच्या खिशात बँकेचे पासबूक होते. त्यावरून जखमीची ओळख पटली. त्यावरून जखमींच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली. मनोज ढेंगळे यांनी तातडीने अपघाताची माहिती वणी पोलिसांना दिली व मारेगाव येथील ऍम्बुलन्सला कॉल करून घटनास्थळी बोलावले. दोन्ही जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना आधी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने नंतर दोघांनाही नागपूर येथे रेफर करण्यात आले.
वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला असता रोही आडवा गेल्याने अपघात झाला असा प्राथमिक अंदाज बांधला आहे. तर घटनास्थळावरील लोकांच्या मते दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे बोलले जात आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. दोघांपैकी एक जखमी सध्या कोमात गेला असून दुस-या जखमींची प्रकृतीही गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.