भरधाव पिकअपची दुचाकीला धडक, एक ठार तर दोघे जखमी

पांडवदेवी येथील प्रसिद्ध यात्रा पाहायला जाताना अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: गायगोधनच्या दिवशी पांडवदेवी येथे होणारी प्रसिद्ध यात्रा पाहायला जाणा-या दुचाकीला पिकअपने जबर धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर दोन जखमी झालेत. संदीप कुडमेथे (45) असे मृताचे नाव असून रवींद्र हरिदास जोगी (35), शालिक चेंडकू जुनगरी (30) असे जखमींचे नावे आहेत. शनिवारी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान खडकी बसथांब्यासमोर हा अपघात झाला. घटनेनंतर पिकअप चालक पिकअप घेऊन पसार झाला.

मृत संदीप कुडमेथे व रविंद्र, शालिक हे तिघेही चोपन येथील रहिवासी आहे. ते प्रसिद्ध असलेल्या पांढरदेवी मंदिरातील गायगोधन कार्यक्रम पाहण्यासाठी दुचाकीने (MH29AX 3682) जात होते. दरम्यान खडकी बस स्टॉपजवळ समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील संदीप कुडमेथे, रवींद्र जोगी आणि शालिक जुनगरी गंभीर जखमी झाले.

अपघात घडताच पिकअप वाहन घटनास्थळावरून पसार झाले. अपघात झाल्याचे कळताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तिघांनाही पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. जखमी संदीप कुडमेथे हा गंभीर जखमी होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धडक देऊन पळून गेलेल्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.

Comments are closed.