पाटाळा पुलावर अपघात: तिघे जखमी, एक गंभीर
वणी/विवेक तोटेवार: वणी-वरोरा मार्गावरील बुधवारी संध्याकाळी छोटा मालवाहक ऍपे आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. यात तिघे जण जखमी झाले आहेत. तर त्यातील एका जणाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर असलेल्या व्यक्तीला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दुचाकी चालक ज्ञानेश्वर संतोष बलकी वय 38 वर्ष हा मारेगाव येथील रहिवाशी आहे. त्याच्या बहिणीचा विवाह आहे. त्यानिमित्त तो दुचाकीने बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्याचं काम करत होता. बुधवारी ज्ञानेश्वर लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी गेला होता. संध्याकाळी ज्ञानेश्वर पत्रिका वाटून वणीकडे परत येत होता. दरम्यान मालवाहक ऍपे क्रमांक एम इएच 34 ए बी 6131 ह बैल विकून वणीवरून वरोरा जात होता. या गाडीत संजय धानोरकर व नितेश पारखी हे दोघे प्रवास करीत होते. पाटाळ्याच्या पुलावर पोहोचताच ऍपेची आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहने नदीत कोसळले. यात तिघे जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. लगेच तिथे असलेले लोक मदतीसाठी धावले. त्यांनी नदीत कोसळलेल्या अपघातग्रस्तांना बाहेर काढले. वेळीच मदत मिळाल्याने अनर्थ टळला. ऍपे मधील दोघांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. तर तिसऱ्या गंभीर असलेल्या व्यक्तीवर चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. पाटाळ्याचा पुल अरुंद आहे. तसंच या पुलाला कठळे देखील नाही. हा पुल अरुंद असल्याने इथे नेहमीच अपघाताच्या घटना होताना दिसतात.