नांदेपेरा रोडवर कोळशाची वाहतूक करणा-या ट्रक चालकांवर कारवाई

अवजड वाहतूक मारेगाव-करंजी-वडकीमार्गे करण्याचे आवाहन

विवेक तोटेवार, वणी: अवजड वाहतुकीस नांदेपेरा मार्गावरून प्रतिबंध असताना वणी ते नांदेपेरा मार्गावरून अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सोमवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास नांदेपेरा रोडवरील 12 ट्रकवर वाहतूक विभागाद्वारे कारवाई करण्यात आली. यांच्याकडून एकूण 9 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अवजड वाहतूक मारेगाव-करंजी-वडकी-वरोरा-एकोना मार्गे करावी, असा जिल्हाधिकारी यांचा आदेश आहे. त्यामुळे चालकांनी करंजी मार्गे वाहतूक करावी असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

वणी-नांदेपेरा या मार्गाची क्षमता साध्या वाहतुकीची आहे. मात्र टोल व काही किलोमीटरचे अंतर वाचवण्यासाठी ट्रकचालक हिंगणघाट, राळेगाव जाण्यासाठी मारेगाव- करंजी- वडकी या मार्गाऐवजी नांदेपेरा-खैरी मार्गावरून कोळशा भरलेल्या ट्रकची वाहतूक करतात. अवजड वाहतुकीमुळे वणी नांदेपेरा रस्त्याची चाळणी झाली आहे. याबाबत नांदेपेरा व या मार्गावर असलेल्या गावातील रहिवाशांनी वारंवार आंदोलन केले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरून अवजड वाहने बंद करण्याचा आदेश काढला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याच आदेशाची अंमलबजावणी म्हणून सोमवारी 2 सप्टेंबर रोजी वणीच्या वाहतूक उपशाखेद्वारा रात्री 8 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली. यात 12 वाहनांवर एकूण 9 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यापुढे कुणीही या रस्त्याने कोळशाची अवजड वाहतूक केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेच्या सपोनि सीता वाघमारे यांनी सांगितले. या मार्गावरून चालणारी वाहतूक ही वणी-मारेगाव-करंजी-वडकी-खैरी-वरोरा(एकोना) मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे या मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करावा, असे आवाहनही सीता वाघमारे यांनी केले.

Comments are closed.