पुरुषोत्तम नवघरे, वणी: वांजरी या गावात एक साडे 10 फुटी अजगराला रेस्क्यू करण्यात आले. वनविभाग व स्थानिक वन्य प्रेमींच्या समयसुचकतेमुळे सापाला जीवदान मिळाले. दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली.
वणी तालुक्यातील वांजरी या गावामध्ये पोळा आटोपल्यानंतर रात्री 8:30 च्या सुमारास गावातील काही लोकांनी अजगर पाहिला. त्यामुळे एकच दाणादाण उडाली. गावातील काही तरुणांनी त्याला मारण्याची तयारी करताच तरुण बांधव धीरज बघवा व मनोज बघवा यांनी स्थानिक लोकांना समजावून परिस्थिती आटोक्यात आणली. घटनेची माहिती स्थानिक वन्यजीव प्रेमी सुबोध आवारी यांना दिली. त्यांनी ही माहिती वनविभागाला कळवली.
माहिती मिळताच वणीचे क्षेत्र सहायक संजयजी राजूरकर यांनी समयसूचकता दाखवत वन रक्षक सतीश कतुरे, वन्यजीव प्रेमी सुबोध आवारी, सर्पमित्र अविनाश हिवलेकर, चालक योगेश वालकोडावार, शंकर देठे यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर संतप्त गावकऱ्यांची समजूत घालून त्यांनी त्या अजगराला रेस्क्यू केले.
हा साप इंडियन रॉक पायथन (अजगर) या प्रजातीचा असून त्याची लांबी तब्बल १० फूट ६ इंचं इतकी असून त्याचे वजन अंदाजे २० किलो होते. त्यानंतर त्या सापाची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक आवासात सोडण्यात आले. गावातील जागरूक तरुण, वन्यजीव प्रेमी व प्रामुख्याने वनविभागाच्या कर्तव्यदक्षते मूळे सापाला जीवनदान मिळाले.
Comments are closed.