नुकसाग्रस्त भागासाठी अधिक मदतीची मागणी करणार: अजित पवार

व्यथा सांगताना शेतकऱ्यांना अश्रू झाले अनावर

भास्कर राऊत, मारेगाव: पुराने क्षतीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. पुराच्या पाण्याने अनेक शेतजऱ्यांची शेतीच खरडून नेली. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार असून शासनाला धारेवर धरण्याचे काम करू असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. ते मारेगाव तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले होते. यावेळी त्यांनी दापोरा येथील पूरग्रस्त शेतक-यांशी संवाद साधला. 

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव वणी भागात पावसाने कहर केला. विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचेही पवार म्हणाले.

व्यथा सांगताना शेतकऱ्यांना अश्रू झाले अनावर
शेतातील व्यथा अजितदादा यांच्यापुढे कथन करीत असतांना तालुक्यातील चिंचमंडळ येथील शेतकरी गुरुदेव पचारे यांना अश्रू अनावर झाले. अख्या कुटुंबाच्या नावावर असलेली 20 एकर शेती पुराच्या पाण्याने खरडून नेली. शेतातील शेडमध्ये ठेवलेल्या रासायनिक खताच्या 120 बॅग, पोल्ट्री फॉर्ममधील हजारच्या वर कोंबडे तसेच 6 बकऱ्यासुद्धा या पुरात वाहून गेल्या. आता जगायचे कसे असे म्हटल्यावर अजित पवार यांनी या शेतकऱ्याचे अश्रू पुसत धीर दिला. यावेळी अनेकांनी त्यांच्यामधील मायेचा अनुभव घेतला.

पूरग्रस्त भागातील अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती असून शेतकरी व्याकूळ झालेला आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीने कसे सुरू होतील, त्यांना मदत कशी होईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यांना दुबार पेरणी करायची असेल तर बियाणं परत कसं मिळेल याचं उत्तर पाहिजे. या समस्यांवर कोणी बोलतच नाही, असे पवार म्हणाले. फक्त वरवर घोषणा नको. कृती झाली पाहिजे. अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

आजपर्यंत बघितलेल्या नुकसानीपेक्षा जास्त नुकसान
पूरग्रस्त भागाचा मी सातत्याने दौरा करीत आहो. त्यामध्ये मारेगाव तालुक्यातील दापोरा या भागातील शेतीची भयानकता समोर आली आहे. मी आजपर्यंत एवढे नुकसान झाल्याचे कुठेच बघितले नाही असे अजित पवार म्हणाले. कारण येथील शेती ही सतत 5 दिवस पुराच्या पाण्याखाली होती. त्यामुळे येथील पीक अक्षरशः जळले. काहींची शेतीतील पिके ही मातीसहित खरडून नेल्याने अनेकांच्या जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments are closed.