सावधान…! आता पैनगंगा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

इसापूर धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता... पशूधन व शेतीपयोगी वस्तू सुरक्षीत स्थळी ठेवण्याचे आवाहन

जितेंद्र कोठारी, वणी: इसापूर धरणातून कोणत्याही क्षणी पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान गावक-यांनी पशुधन व शेतीउपयोगी साहित्य सुरक्षीत स्थळी ठेवण्याचे आवाहन झरीजामणीचे तहसीलदार गिरीश जोशी यांनी केले आहे. झरी तालुक्यातुन पैनगंगा नदी आणि खुनी नदीचे प्रवाह आहे.

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरु आहे. धरणाच्या साठवणूक क्षमतेचा 75 टक्का इतका पाणीसाठा झाला असून पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरण्याच्या सांडव्याद्वारे कोणत्याही क्षणी पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आली आहे. इसापूर धरणाचे दार उघडल्यास नदी पात्रात पाणीपातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘या’ गावांना असतो कायम धोका
झरी तालुक्यातील माथार्जुन मंडळ हद्दीत 8 गावे मुकुटबन मंडलमधील 6 आणि झरी मंडळ अंतर्गत 6 गाव पूर क्षेत्रात येते. त्यात दुर्भा, धानोरा आणि दिग्रस ह्या तीन गावाच्या चारही बाजूने पुराचा पाणी वेढा घालतो. मागील 10 दिवसांपासून सुरु अतिवृष्टीमुळे झरी तालुक्यातील 860 हे.आर. शेतजमीनीवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहे.

झरीजामणी तालुक्यातील पैनगंगा नदी व खुनी नदीचा पाणीसाठा पुर्ण झाला आहे. त्यामुळे नदी व नाल्याचे काठावरील गावातील नागरिकांनी आपआपली गुरेढोरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी ठेवावे व सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. तसेच अतिवृष्टीमुळे सुध्दा नदी नाले यांना पुर येण्याचा धोका असल्यामुळे नदी नाले व ओढयाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.

पाणी पातळी वाढ होत असल्यास नागरिकांनी नदी पात्रातुन तसेच ओढे व नाले या पासुन दुर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे. नदी अथवा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पुल ओलांडून नये. पुर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीत आश्रय घेवु नये. असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तर्फे झरीजामणी तालुक्यातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

 

Comments are closed.