बहुगुणी डेस्क, वणी: स्वीटी म्हणजे अलोणे परिवाराची सर्वात लाडकी. सर्वांचाच तिच्यात जीव गुंतलेला. याच स्वीटीने आपली कृतज्ञता व्यक्त केली. पहिला क्रमांक पटकावून. ही स्वीटी आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर ही स्वीटी आहे एक देशी कालवड. पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती झरी जामनीद्वारा आयोजित पशू प्रदर्शनी मध्ये पशुपालक डॉ. संकेत अलोणे यांची स्वीटी नामक देशी कालवड उतरली. एवढंच नव्हे तर प्रथम क्रमांक पटकावत उपस्थित पशुपालकांचं लक्ष वेधून घेतलं.
सोबतच स्वीटीची जन्मदात्री ढिल्लू नामक देशी गाईनेदेखील पुरस्कार प्राप्त करीत लक्ष्मीबाई अलोणे यांना सन्मान प्राप्त करून दिला. शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी ही प्रदर्शनी झाली. त्याचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार,
पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, नगराध्यक्ष ज्योती बिजगुणवार, गटविकास अधिकारी रवींद्र सांगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एॅड. राजीव कासावार, प्रकाश कासार, प्रकाश, दिलीप भोयर व पशुधन विकास अधिकारी डॉ. नीलेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील विविध गावांमधून पशुपालकांनी विविध गटांत 500च्या वर पशुपक्ष्यांची नोंद केली. बैलजोडी, देशी गाई, संकरित जनावरे, कोंबडे, शेळ्या, मेंढ्या अशा विविध गटांतील पशूंचा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. विविध गटांत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना एकूण 2 लाख 30 हजार रूपयांची रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मान चित्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले यांनी केले. उपायुक्त डॉ. विजय रहाटे यांनी आयोजनामागची भूमिका विशद करून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. उद्घाटक आमदार संजय दरेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत पशू आरोग्य आणि पशु सेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले. मडावी यांनी संचालन केले. प्रदर्शनीचे उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल डॉ. नीलेश राठोड व त्यांच्या चमूचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले.
Comments are closed.