सुशील ओझा, झरी: दोन आठ आठवड्याआधी तालुक्यातील मुकुटबन येथे 3 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. कालच त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली होती. मात्र ते रुग्ण बरे होऊन एक दिवस जात नाही तो मुकुटबन येथे आणखी 4 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. हे चारही पॉजिटिव्ह आरसीसीपीएल कंपनीतील कामगार आहेत. चार आणखी रुग्ण आढळताच झरी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 8 झाली आहे.
25 जुलै रोजी आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत उत्तरप्रदेश येथील 27 कामगार आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यातील 3 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले होते. हे तीन रुग्ण कंपनीतील 350 जणांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे प्रशासनाने त्यातील 152 जणांचे स्वॅब पाठविले होते. त्याचा आज रिपोर्ट आला असून यातील 4 रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत. तर अद्याप 152 रिपोर्ट 45 रिपोर्ट येणे बाकी आहे.
काल 8 ऑगस्टच्या रात्री उशिरा 4 कामगारांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. माहिती प्राप्त होताच तहसिलदार रामचंद्र खिरेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांच्या सह आरोग्य विभागाचे कर्मचारी व ठाणेदार धर्मा सोनुने यांनी कंपनीत जाऊन चारही पोजिटिव्ह रुग्णांना झरी येथील राजीव विद्यालयात आयसोलेट केले.
उद्या मुकुटबन येथे जनता कर्फ्यू
झरीत कोरोनाचे 4 रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोमवारी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. सोमवार हा मुकुटबन येथे आठवडी बाजाराचा दिवस आहे. या बाजारात कंपनीतील तसेच इतर भागातील व्यापारी विक्रीसाठी तर परिसरातील खेड्यापाड्यातील ग्राहक खरेदीसाठी येतात. कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे कळताच सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, व्यापारी अशोसिएशनचे अध्यक्ष विजय कोठारी, उपाध्यक्ष मंगेश गादेवार, सचिव प्रदीप मासिरकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची ग्रामपंचायत मध्ये बैठक झाली. या बैठकीत खबरदारी म्हणून एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.