बहुगुणी डेस्क, वणी: दोन बायका कधी व कशासाठी एकमेकींसोबत भांडतील याचा नेम नाही. कधीतरी झालेली एखादी छोटीशी घटना पुढे चालून मोठ्या भांडणापर्यंत पोहोचते. शाब्दिक वाद हात घाई वर येतो तोच पुढे एकमेकांना इजाही पोहोचवतो. असंच नजीकच्या लाठी गावातील थुंकण्यावरून झालेलं भांडण सर्वत्र रंगत आहे. रविवार दिनांक 18 मे च्या सायंकाळी सहाच्या सुमारास असंच दोन बायांचे भांडण झालं. त्या भांडणात पुरुषही पडलेत. मग जे झालं अगदी फिल्मी स्टाईलच.
तक्रारीनुसार नजीकच्या लाठी गावात फिर्यादी सिंधू माधव पिंपळकार (60) ही शेतमजुरी करणारी महिला राहते. त्यांच्या घरापासून काही अंतरावर शेतकाम करणारी आरोपी महिला (50) ही तिच्या कुटुंबासह राहते. या दोघींमध्ये कधीतरी एका कारणावरून वाद, शाब्दिक बाचाबाची झाली होती. सिंधू पिंपळकार यांच्या डोक्यातून तो विषय कधीच निघून गेला होता. मात्र रविवार दिनांक 18 च्या सायंकाळी 6.00 च्या दरम्यान आरोपी महिला ही सिंधू पिंपळकर यांच्या घरासमोर रोडवर आली. आल्याआल्याच ती जुना मुद्दा उकरायला लागली. आरोपी म्हणाली, की तू त्या दिवशी मला पाहून का थुंकली होती? असं म्हणून तिनं सिंधूसोबत वाद घातला.
त्यावर सिंधू पिंपळकार यांनी स्पष्टिकरण दिलं. सिंधू म्हणाल्या, की मी तुझ्याकडे पाहून थुंकली नाही. नंतर दोघीही आपापल्या घरात गेल्यात. मात्र काही वेळातच आरोपी महिला ही तिच्या आशीष (30) व प्रदीप (28) या दोन मुलांसह सिंधू पिंपळकार यांच्या घरासमोर आली. आता हे दोघं मुलं वाद घालायला लागलीत. तू आमच्या आईसोबत वाद का केला? असं विचारू लागलेत. तेवढ्यात या दोन्ही मुलांनी हातातील लाकडी काठीने सिंधू पिंपळकार यांच्या डोक्यावर वार केला. डाव्या पायावर व दोन्ही हातांवर मारुन त्यांना जखमी केलं.
शिवीगाळ करुन मारण्याची धमकीही दिली. दरम्यान आरोपी महिलेने सिंधू पिंपळकार यांचे केस धरुन सिंधू यांना ढकलाढकल केली. पुन्हा शिवीगाळ केली. तेव्हा सिंधू यांचे पती माधव पिंपळकार त्यांना सोडविण्यासाठी धावलेत. तेव्हा त्यांनासुध्दा आशीष व प्रदीप यांनी थापडाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. वरुन मारण्याची धमकीही दिली. हे भांडण गावातील तिघांनी सोडविलं. त्यानंतर आरोपी महिला, आशीष व प्रदीप हे तिघेही घरी निघून गेलेत. नंतर सिंधू पिंपळकार यांनी पती व मुलीसोबत येऊन शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार तिन्ही आरोपींवरती बीएनएसच्या कलम 115(1), 118(1), 3(5), 351(2), 352 अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहे.
Comments are closed.