वाहतूक विभागाची शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

रस्त्यावरील हातगाड्या व दुकानाचे बोर्ड काढले, प्रवासी ऑटोमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील रस्त्यांवर वाढत्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी शुक्रवार 8 एप्रिल पासून अतिक्रमण हटाव मोहीम उघडली आहे. वाहतूक पोलीस उप शाखेचे सपोनि संजय आत्राम यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेचे संपूर्ण कर्मचारी रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे.

रविवार 10 एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती व रमजान ईद सणाच्या निमित्ताने वणी पोलीस ठाण्यात शांतता कमिटी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत शहरातील अंतर्गत रस्त्यांवर दुकानदार व हातगाड्याच्या अतिक्रमणामुळे मिरवणूकीमध्ये अडचण निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

नगरपरिषद कडून दरवर्षी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत असते. मात्र काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे होऊन जाते. शहरातील टिळक चौक येथे चायनीज, भेळपुरी, पाणीपूरी, आईस्क्रीमच्या हातगाड्या तसेच फळभाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटलेली आहे. तर गांधी चौक व जटाशंकर चौकात पायदळ फिरणे अवघड झाले आहे. प्रवासी ऑटो चालकांनी तर शहरातील रस्त्यांवर जणू ताबाच मिळविला आहे.

वाहतूक उपशाखेत नुकतेच रूजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आत्राम व पोलीस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभर गांधी चौक येथील अतिक्रमण धारकांना आपले अतिक्रमण काढण्यास भाग पाडले. तर शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंत टिळक चौक, वरोरा रोड व यवतमाळ रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस रस्त्यावर होते.

Comments are closed.