आज रामनवमी निमित्त शहरात निघणार भव्य शोभायात्रा

यंदा राहणार 4 रामरथ, नेत्रदीपक रांगोळी शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण

जितेंद्र कोठारी, वणी: प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीनं रामनवमीनिमित्त आज रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी वणी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी च्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी रामनवमी शोभायात्रा गेली दोन वर्ष कोरोना परिस्थितीत असलेल्या निर्बंधांच्या कारणामुळे आयोजित करण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे रामनवमी शोभायात्रा आकर्षक आणि आदर्शवत अशीच होईल यादृष्टीने श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समिती अहोरात्र झटत आहे.

सदर शोभायात्रा ही संध्याकाळी 5 वाजता जुन्या स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरातून निघणार. श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींची विधिवत पूजन करून या शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे. या मूर्ती सुभोभित अशा रथामध्ये विराजमान केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे या शोभायात्रेत यंदा चार रथ राहणार आहेत. रामरथ रामभक्तांद्वारे शोभायात्रा मार्गावर हाताने ओढण्यात येणार आहे.

असा राहणार मार्ग
जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरातून सुरु होणारी शोभायात्रा शाम टॉकीज चौक, दिपक चौपाटी, भगतसिंग चौक (काठेड चौक), गाडगेबाबा चौक,सर्योदय चौक,टागौर चौक,टुटी कमान चौक,अणे चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बॅंक चौक मार्गे जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरात महाआरती नंतर समापन होणार आहे.

नेत्रदीपक रांगोळी राहणार प्रमुख आकर्षण
यंदाच्या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण हे पुणे येथील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार भुषण खंडारे यांची रांगोळी राहणार आहे. शोभायात्रा मार्गावरील प्रत्येक चौकात फक्त दोन मिनिटात नेत्रदीपक अशी रांगोळी काढली जाणार आहे. शहरात प्रथमच अशी कला सादर होणार आहे.

वणीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले आहे.

Comments are closed.