बहुगुणी डेस्क, वणी: प्लास्टीक पट्टीचा वापर करीत चारगाव चौकीवरील एटीएममधून चोरी करणा-या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. फेब्रुवारी महिन्यात या चोरट्यांनी प्लास्टीक पट्टीचा वापर करीत एटीएममध्ये 10 हजारांचा डल्ला मारला होता. सीसीटीव्ही फूटेजमधून ही चोरी उघड झाली होती. शिरपूर पोलिसांनी मंगळवारी दोन्ही चोरट्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहिती नुसार, चारगाव चौकीवर हिताची कंपनीचे एटीएम आहे. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी या एटीएममधून 10 हजारांची चोरी झाली होती. या चोरीचा तपास करताना शिरपूर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज चेक केले. त्यांना यात दोन व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आलेत. पोलिसांनी आरोपी सुशील वसंत तोडेकर (36) व नरेश रामदास घुगुल (33) दोघेही राहणार बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांना ताब्यात घेत शिरपूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले.
दोघांनीही पैसे चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर बीएनएसच्या कलम 305 व 62 नुसार गुन्हा दाखल केले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
कसे काढायचे पट्टी लावून पैसे?
एटीएममध्ये प्लास्टीक पट्टी लावून पैसे चोरी करण्याची ही एक नवीन शक्कल आहे. यात एटीएम मशिनच्या कॅश ड्रॉव्हरच्या बाहेर एक प्लास्टिकची पट्टी चिकटवली जाते. जेव्हा कुणी ग्राहक एटीएममध्ये कार्ड टाकून पैसे काढतात, तेव्हा ट्रान्झॅक्शनची संपूर्ण प्रक्रिया होते. ग्राहकाला पैसे काढल्याचा मॅसेज येतो. मात्र कॅश ड्राव्हरमध्ये पट्टी लावल्याने सदर पैसे हे तिथेच अडकून राहतात. ग्राहक एटीएममध्ये बिघाड झाल्याचे समजून तिथून निघून जातो. ग्राहक गेल्यानंतर चोरटे पुन्हा एटीएममध्ये जातात. कॅश ड्रॉव्हरमध्ये प्लास्टिक प्लेट लावल्याने अडकलेले पैसे काढतात. देशभरात या पद्धतीचा वापर करून अनेक चोरी झाल्या असल्या तरी वणी परिसरात हे पहिलेच प्रकरण उघडकीस आले आहे. असे पैसे अडकल्यास एटीएमच्या कस्टमर केअरला फोन करून ग्राहकांना ही माहिती देता येऊ शकते.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधवंत, पोहकों सुरज साबळे, अभिजित, पंकज कुडमेथे, होमगार्ड आकाश टेकाम, पोलिस मित्र विक्की नागतुरे यांनी केली.
महिलांसाठी खुशखबर: मेकअप व मेहंदी क्लासची शॉर्ट टर्म बॅच सोमवारपासून
Comments are closed.