विरोधात बातमी टाकल्याच्या रागातून पत्रकाराला हॉकी स्टिकने मारहाण

चोघांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींमध्ये एका पक्षाच्या माजी पदाधिका-याचाही समावेश.... पत्रकार संघटनेची हल्लेखोरांवर कठोर शासन करण्याची मागणी...

जब्बार चीनी, वणी: विरोधात बातमी टाकल्याच्या रागातून शहरातील एका सुपरिचित पत्रकाराला हॉकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात आली. सोमवारी दिनांक 11 एप्रिल रोजी बायपास रोडवरील नांदेपेरा चौफुलीवर ही घटना घडली. या संबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीमध्ये एका राजकीय पक्षाच्या माजी पदाधिका-याचाही समावेश आहे. रवि ढुमणे असे हल्ला झालेल्या पत्रकाराने नाव असून गणपत लेडांगे, महेश चौधरी व साथीदार असे आरोपींचे नावे आहेत. दरम्यान दर्पण पत्रकार संघातर्फे या हल्ल्याचा निषेध केला असून प्रकरणाची सखोल चौकशी करावी व आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की रवि ढुमणे ते गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून सध्या ते नांदेपेरा चौफुली, बायपास रोडवरील चामाटे लेआऊट येथे राहतात. एक वृत्तपत्र तसेच एका न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सध्या ते पत्रकारिता करतात. दिनांक 11 तारखेला त्यांनी रेती तस्करीविरोधातील एक बातमी वृत्तपत्र व पोर्टलमध्ये प्रकाशित केली होती. तेव्हापासून त्यांना याबाबत कॉल येत होते. दुपारी ते कामानिमित्त तहसिल कार्यालयात गेले होते.

कार्यालयीन काम आटोपून घराकडे येत असताना त्यांना थंड पेय घेऊ म्हणून एकाने बोलावले होते. थंड पेय घेतल्यानंतर रवि ढुमणे हे आपल्या दुचाकीवर बसले आणि घराकडे जात होते. दरम्यान मागून आरोपी गणपत लेडांगे हे आपल्या साथीदारांसह चारचाकी वाहनात बसून आले. त्यांना रवि ढुमणे यांना थांबवले व बातमीबाबत विचारणा केली. दरम्यान त्यांनी रवि ढुमणे यांच्यावर हॉकी स्ट्रिकने वार केले.

तिघांनी रवि ढुमणे यांना मागून वार केला तर गणपत लेडांगे यांनी लाकडी दांडा काढून डोक्यावर प्रहार केला, मात्र रवि ढुमणे यांनी डोक्यावर हात ठेवत बचाव केला. मारहाण करून हल्लेखोर घटनास्थळावरून कारने पसार झाले. या बेदम मारहाणीत रवि ढुमणे यांना कमरेत, मानेवर, पाठीत आणि दोन्ही हाताला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

रवि ढुमणे यांनी जखमी अवस्थेत आपल्या मुलांना बोलवून घेतले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांनी या घटनेची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी आरोपी गणपत लेडांगे, महेश चौधरी व इतराविरुद्ध भादंविच्या कलम 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हल्लेखोरांना कठोर शासन करा: पत्रकार संघटना
गेल्या काही दिवसांमध्ये विरोधात बातमी टाकल्याच्या रोशातून सातत्याने हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहे. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा खांब मानला जातो. त्यामुळे हा हल्ला केवळ पत्रकारितेवर नाही तर लोकशाहीवर हल्ला आहे. पत्रकारांवर बेदम मारहाण करून त्यांच्यात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारिता कशी करावी हा प्रश्न उपस्थित होत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोऱ व त्यामागे असणा-या शक्तीवर कठोर शासन करण्यात यावे.
– अध्यक्ष, दर्पण पत्रकार संघ, वणी

Comments are closed.