रामनामात रंगली वणी, अयोध्येतील सोहळ्याचा जल्लोष

विविध कार्यक्रमांचे आयोजन, जय श्रीरामचा गजर.. आतषबाजीने व्यापला आसमंत

बहुगुणी डेस्क, वणी: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी पहाटे पासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढण्यात आल्या. मंदिरात भजन, कीर्तनाचे सूर कानी चढू लागले. अयोध्येत श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच शहरात रामनामाचा गजर झाला. संपूर्ण दिवसभरच हा जल्लोष सुरू होता. संध्याकाळी घरोघरी दीप लागले. फटाक्याच्या आतषबाजीने आसमंत व्यापला. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला.

अयोध्येत सोमवारी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण शहर भगव्या पताका, झेंडे यांनी सजवले होते. विविध संस्था, संघटना, मंडळांच्या कार्यकर्त्यांतर्फे वणीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सामाजिक संस्था, संघटनेतर्फे ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 5.30 वाजता विजय चोरडिया यांच्या तर्फे टागोर चौक येथील शंकरजीच्या मंदिरातून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली संपूर्ण वणीत मार्गक्रमण करून याच ठिकाणी रॅलीची सांगता झाली. रॅली नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गांधी चौक, आंबेडकर चौक, टागोर चौक, छत्रपती शिवाजी चौकातील व्यापाऱ्यांनी अनेक आयोजन केले होते. 

काळाराम मंदिरात विविध कार्यक्रम
रामपुरा वार्ड येथील प्राचीन काळाराम मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५:३० वाजता काकड आरती, सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्रीराम दरबार विग्रह अभिषेक, होमहवन, दुपारी १२ वाजता विजय चोरडिया यांच्या शुभहस्ते पंडित निशिकांत वैष्णव यांनी शेगाव महाआरती केली. त्यानंतर महाप्रसाद वितरण व भजनाचा कार्यक्रम पार पडला. यासोबतच रामरक्षा स्तोत्र, रामनाम जप व हनुमान चालिसा पठण झाले. सायंकाळी ७ वाजता महाआरती व संपूर्ण मंदिरात दीपोत्सव व आतषबाजीसह हभप मनुमहाराज तुगनायत यांचा संगीतमय सुंदरकांड पाठ झाला.

सुंदरकांड सादर करताना हभप मनुमहाराज तुगनायत

शोभायात्रा समितीद्वारा गीत यज्ञ
वणी येथील श्री रामनवमी जन्म उत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीराम गीत यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ७ वाजता जुन्या स्टेट बँकेजवळील श्रीराम मंदिरात करण्यात आले. या कार्यक्रमात गदिमा रचित गीत रामायणातील निवडक गीते सादर करण्यात आली. स्थानिक खाती चौकातील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुदेव खुशालदासजी महाराज कलनौर यांच्या उपस्थितीत रजत आहोत्सव व माँ दुर्गा शक्ती आणि शिव परिवाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

आरतीनंतर शहरातून कलशयात्रा काढण्यात आली. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा पंडित आचार्य अनिल रईच यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच हनुमान चालिसा पठण करण्यात आले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. वणीतील अमृत भवन येथील मारोती देवस्थानातही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Comments are closed.