शिवसेना स्टाईलने धानोरकरांनी फुंकले वणीत रणशिंग

माझ्यासोबत याल तर गुन्हे सुद्धा दाखल होतील: धानोरकर

0

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार सुरेश (बाळू) धानोरकरांनी शिवसेना स्टाईलने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर आपल्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ते आज मंगळवारी 26 मार्चरोजी वणीतील वसंत जिनिंग सभागृहात सायंकाळी 8 वाजता पार पडलेल्या महाआघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी वणीचे माजी आमदार वामनराव कासावार, सुभाष धोटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. ख्याजा बेग, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा, ऍड देविदास काळे इत्यादी नेते उपस्थित होते.

लोकसभेच्या उमेदवारीचे तिकिट भेटल्यानंतर आज प्रथमच धानोरकर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधत होते. 22 वर्ष शिवसेनेत राहिल्यामुळे त्यांच्या भाषणातून पदोपदी शिवसैनिकच बोलत असल्याचा भास होत होता. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे सभागृहात कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून त्यांना दाद देत होते. कार्यकर्त्यांचा हा उत्साह त्यांनी बरोबर हेरुन आपल्या भाषणातून भाजप सरकार व विशेषतः भाजपाचे उमेदवार खा. हंसराज अहिर यांच्यावर शरसंधान केले. शिवसेनेचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा प्रमुख या नात्याने सहाही विधानसभा मतदारसंघात आपण शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, यांच्या प्रश्नासोबतच वेकोलिचे अनेक प्रश्नही हाताळले, याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

पण ही आठवण करून देताना आपण ती सगळी आंदोलने शिवसेना स्टाईलने कशी यशस्वी करून दाखवली हे सांगायला ते मात्र विसरले नाही. धानोरकरांच्या आधी बोललेल्या ऍड देविदास काळे यांनी आपल्या भाषणातून शिवेसेनेने आपल्याला विरोध केला होता याची आवर्जून आठवण करून दिली. या आठवणीने धानोरकर यांच्यामधील शिवसैनिक जागा होऊन त्यांनी ऍड देविदास काळे यांना रंगनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना कशी मदत केली होती याची आठवण करून दिली.

या मेळाव्याच्या निमित्ताने बोलताना धानोरकरांनी आपल्या आक्रमक शैलीचा परिचय देताना सांगितले की लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवताना आपल्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आणि तुम्ही जर माझ्या सोबत सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन मैदानात उतरला तर तुमच्यावरही अनेक गुन्हे दाखल होऊ शकतात. याचीही जाणीव त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करून दिली.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा आदराने उल्लेख करत आपण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्याविरोधात आपण एकही शब्द बोलणार नाही, असे सांगून त्यांनी शिवसैनिकांनासुद्धा अप्रत्यक्षपणे चुचकारण्याचा व आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

वणी विधानसभेतून आपल्याला एक लाखांच्या वर लीड मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. हा आशावाद आता 11 एप्रिलला होणा-या निवडणुकीत मतदारराजा किती सार्थपणे सत्यात उतरवतो ते 23 मेच्या मतमोजणीतच दिसून येईल.

काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरताना 20 कोटींची डिलिंग?
आपल्याला लोकसभेची उमेदवारी घोषीत होण्याच्या आधी दोघा उमेदवारांची नावे पक्षाने निश्चित केली होती. असे सांगत असताना धानोरकरांनी यातील चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या बाहेरील उमेदवाराचे नाव निश्चित करताना पक्ष निधीच्या नावाखाली 20 कोटी रुपयांची डिलिंग झाल्याचाही जाहीर गौप्यस्फोट यावेळी केला. यावेळी त्यांचा रोख मुत्तेमवारांकडे असल्याची कुजबुज उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होती.

आपल्याला काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यात विजय वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे, सुभाष धोटे, वामनराव कासावार यांनी मदते केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

शरद पवार यांनी राहुल गांधींना दुरध्वनी करून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून शब्द टाकला होता. असेही धानोरकर यांनी सांगितले. त्यामुळे वणी बहुगुणीने या आधी प्रकाशित केलेल्या वृत्ताला दुजोरा मिळाल्याचे सिद्ध होते.

लिंकवर क्लिक करून पाहा काय म्हणाले बाळू धानोरकर…

Leave A Reply

Your email address will not be published.