मद्य विक्रेत्यांना इशारा; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

वणी पोलीस स्टेशनमध्ये बार, वाईन शॉप चालकांची बैठक

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वणी पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवारी संध्याकाळी बार, रेस्टॉरंट, वाईन शॉप आणि बिअर शॉप चालकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला.

वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर व वाहतूक शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्या उपस्थितीत ही बैठक सायंकाळी 7.30 वाजता पार पडली. बैठकीस एकूण 17 बार, रेस्टॉरंट, वाईन शॉप व बिअर शॉप व्यावसायिक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बैठकीत व्यावसायिकांना व्यवसाय करताना शासनाने निश्चित केलेल्या वेळेचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ठरवून दिलेल्या वेळेपूर्वी अथवा वेळेनंतर व्यवसाय सुरू ठेवू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.
तसेच 18 वर्षांखालील व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत मद्यविक्री करू नये, अशी सूचना देण्यात आली. बार, रेस्टॉरंट आणि परिसरात किमान एक महिन्याचा बॅकअप उपलब्ध राहील अशा दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले.

व्यवसायस्थळांबाहेर वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.

याशिवाय सर्व व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवहीत ठेवून ती नियमितपणे अद्ययावत ठेवावी, असे निर्देश देण्यात आले. दरम्यान, बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला.

Comments are closed.