निकेश जिलठे/विवेक तोटेवार, वणी: वणीत ठाणेदार म्हणून पीआय भानूदास पिदूरकर यांची पदभार स्वीकारला आहे. पीआय गोपाळ उंबरकर यांची कामगिरी समाधानकारक म्हणता येईल. काही क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा त्यांनी लावला. मात्र वणीकरांच्या दैनंदिन समस्या आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत विशेष बदल अनुभवास आला नाही. त्यामुळे वणीकरांना नव्या ठाणेदारांकडून मोठ्या अपेक्षा आहे.
वणी हा त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे विशेष महत्त्वाचा आहे. खनिज संपत्तीने समृद्ध परिसर अशी या परिसराची ओळख आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्याचा सुळसुळाट आहे. यात काही नियमीत तर काही सिजनेबल अवैध धंदे आहेत. वणी शहर हे धार्मिक दृष्ट्या शांत म्हणून ओळखले जाते. गेल्या 4-5 वर्षापासून वणीकर घरफोडी, ड्रग्ज, सट्टा इत्यादींनी त्रस्त आहेत.
ओव्हरलोड वाहतूक, रेती व खनिज चोरी
परिसरात मोठ्या प्रमाणात खाणी असल्याने येथून मोठ्या प्रमाणात कोळसा, सिमेंट, गिट्टी, मुरुम तसेच खनिज संपत्तीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असेत. जड व ओव्हरलोड वाहनांकडून येथे मोठ्या प्रमाणात वसुली चालते. तसेच रेतीची तस्करी चालते. यावर अनेकदा कारवाई देखील होते. मात्र ही वरवरची कारवाई असते. दर वेळी चालकावर गुन्हा दाखल केला जातो मात्र मुळ तस्कर मात्र मोकाटच असतो.
अवैध दारूविक्री, मटका-सट्ट्याचा सुळसुळाट
परिसरात मटका मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. शहरात व ग्रामीण भागात राजरोसपणे मटका चालतो. यावर वेळोवेळी पोलिसांची धाड पडते. मात्र शे पाचशेचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर लगेच त्याच दिवशी पुन्हा मटका सुरु होतो. क्रिकेट मॅच सुरु झाली की सट्टेबाजीला उधाण येते. ग्रामीण भागात अवैध दारुविक्रीची मोठी समस्या आहे. रस्त्यावरील अनेक फाट्यावर राजरोसपणे दारुची अवैधरित्या विक्री होते. तसेच गावातील अनेक घरातून देखील देशी-विदेशी दारूची विक्री होते.
घरफोडीने त्रस्त वणीकर
सध्या वणीत मोठ्या प्रमाणात घरफोडीचे सत्र सुरु आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून हे सत्र अविरत सुरु आहे. एका ठाणेदाराची बदली देखील चोरट्याने घरमालकावर हल्ला केल्याने झाली आहे. काही अपवादात्मक घटना सोडल्या तर कोणत्याही प्रकरणाचा अद्यापही छडा लागलेला नाही. या चोरट्यांचा इतका उन्माद आहे की बंद घर म्हणजे घरफोडी असे एक समीकरण वणीत बनले आहे. विशेष म्हणजे एकच घर चोरट्यांनी दुस-यांदा फोडल्याचा अनोखा प्रकारही येथे समोर आला आहे.
तरुणाईला ड्रग्जचा विळखा !
वणी शहरात गेल्या काही वर्षांपासून गांजाची तस्करी सुरु आहे. तरुण तसेच शाळकरी मुलं याच्या आहारी गेले आहेत. अलिकडेच वणीत एमडी या ड्रग्जची तस्करी देखील फोफावली आहे. वेळोवेळी गांजा सेवन करणा-यांवर कारवाई केली जाते. मात्र ड्रग्ज पेडलरवर व तस्करावर कोणताही कारवाई होत नाही. त्यामुळे ड्रग्जची कारवाई केवळ सेवन करणा-यांपुरतीच मर्यादीत झाली आहे. उंबरकर यांच्या कार्यकाळात एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश झाला होता. मात्र अद्यापही ही तस्करी समुळ नष्ट झाली नाही.
सुगंधी तंबाखू तस्करी
वणीत सुगंधी प्रतिबंधीत तंबाखूची तस्करी मोठ्या प्रमाणात चालते. विराणी टॉकीज, जुना बस स्टॉप परिसरातून ही तस्करी होते. काही तस्कर तर खासगी वाहनाने खेडोपाडी हा माल पोहोचवतात. एका तस्कराने तर डुप्लिकेट तंबाखूची फॅक्टरीच टाकली आहे. यावरही कार्यवाही होणे गरजेचं आहे.
वाहतूक शाखा आणि इतर बदल
दरम्यान, वाहतूक शाखेची जबाबदारी विजय महाले यांच्याकडून काढून नरेश रणधीर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची वर्दळ आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे. तसेच, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण हिरे यांची पुन्हा वणीत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
भानूदास पिदूरकर यांनी यापूर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) म्हणून वणीत सेवा बजावली आहे. शहराची भौगोलिक, सामाजिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांना चांगलीच माहीत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखणे आणि अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ते सक्षम असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.


Comments are closed.