वणीत जल्लोषात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन, रॅलीने वेधले शहराचे लक्ष

जितेंद्र कोठारी, वणी: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वणीत यावर्षी जल्लोषात साजरी करण्यात आली. भीम जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लोकप्रतिनिधी, विविध राजकीय नेते तसेच मान्यवरांनी हार घालून अभिवादन केले. संध्याकाळी शहरातून जंगी रॅली काढण्यात आली. जय भीमच्या ना-यांनी यावेळी संपूर्ण शहर निनादून गेले. 

सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय बौद्ध महासभेतर्फे अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून तसेच हारार्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी सुत्तपठण, पंचशील घेण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. दरम्यान ठाणेदार राजेंद्र महल्ले, उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, इजहार शेख, मंगल तेलंग, वैशाली पाटील यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी हार घालून बाबासाहेबांना अभिवादन केले. दिवसभर अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावली. दरम्यान चौकातच सकाळी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात शेकडो जणांनी रक्तदान करून बाबासाहेबांना आदरांजली वाहली.

शहरातील पंचशील नगर, मनिषनगर, रेल्वे स्टेशन, दामले नगर, रंगनाथ नगर, सम्राट अशोक नगर, भीमनगर इत्यादी ठिकाणांच्या बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. बस स्थानक परिसरात भीम टायगर सेने तर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. शहरात ठिकठिकाणी बाबासाहेबांचे संदेशपर फ्लॅक्स लावण्यात आले होते. संध्याकाळी शहरातील विविध भागातून बँड व डीजेच्या जल्लोषात रॅलीला सुरवात झाली. संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास अशोक नगर परिसरात सर्व रॅली एकत्र येऊन जंगी रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान करण्यात आलेले विविध देखावे यावेळी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते.

वाजत गाजत निघालेल्या या ऱॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. विविध चौकात रॅलीसाठी अल्पोपहार, शरबत, पाणी, मसालेभात इत्यादींची व्यवस्था करण्यात आली होती. गांधी चौकात फळ विक्रेते युनियनतर्फे मीठाई वाटप करण्यात आली. टिळक चौकात तारेंद्र बोर्ड, राजू उंबरकर, इजहार शेख, दिलीप भोयर इत्यादींसह विविध पक्षांच्या नेत्यांतर्फे रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी नेत्यांनी देखील नाचून रॅलीत आपला सहभाग दर्शविला.

वाजत गाजत निघालेल्या या रॅलीची रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सांगता झाली. यावेळी पंचशील घेण्यात आले. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

व्हिडीओ साभार- आनंद शेंडे

Comments are closed.