दोन युवकांना वाहनाने चक्क फरफटतच नेले, युवक गंभीर जखमी

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच बोटोनी जवळील घोगुलदरा फाट्यावरची घटना

बहुगुणी डेस्क, मारेगाव: मराठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच एक भीषण अपघात तालुक्यातील बोटोनी जवळील घोगुलदरा फाट्यावर झाला. या अपघातानंतर वाहनाने युवकांची बाईक बरीच दूर फरफटत नेली. ही घटना आज शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली. या भयंकर अपघातात मारेगाव तालुक्यातील वागदरा येथील दोन तरुण गंभीर जखमी झालेत. सतीश झिंगू आत्राम (35) आणि नीलेश तुकाराम टेकाम (21) अशी जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. घटनेनंतर वाहन चालक पसार झाला. 

सतीश व नीलेश हे रा.वाघदरा (वसंतनगर) ता.मारेगाव येथील रहिवासी आहेत. शनिवारी संध्याकाळी हे दोघे युवक घोगुलधरा इथून बोटोनीकडे बाईकने निघालेत. मात्र वाटेत वणीकडून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या गाडीला जबर धडक दिली. त्यानंतर बराच अंतर ते मोटरसायकलसह फरफटत गेले. एवढ्या दूर गाडी घासत गेल्याने त्यातून आगीच्या ठिणग्याही निघत होत्या. सुदैवाने सराटी रस्त्याजवळ गतिरोधक होते. तिथे त्यांची बाईक त्या वाहनापासून वेगळी झाली. मात्र वाहनचालकाने तिथून लगेच काढता पाय घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या मार्गावरील लोकांना ही गंभीर अवस्था दिसली. त्यांनी दोन्ही जखमी तरुणांना करंजीला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केल्याची माहिती मिळाली आहे. सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.