बेलगाम बाईकस्वार आणि स्व. रुपाली वासेकर यांचा अपघात
रवि ढुमणे, वणी: शहरात सुसाट बाईकस्वार आणि अवैध प्रवासी वाहतूक यांच्या मुसक्या आवळण्यात अद्याप तरी वाहतूक विभागाला यश आले नाही. नांदेपेरा बायपास रोडवर शहरातील अपल्पवयीन मुले दुचाकीची शर्यत लावतात. याबाबत वाहतूक विभागाला वारंवार तोंडी तसेच वृत्ताच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र वणीच्या वाहतूक शाखेला त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. केवळ सामान्य दुचाकीस्वारांना वेठीस धरून कारवाई करणे आणि सुसाट चालविणाऱ्याना मोकळीक देणे, यातच सर्व काही दडलंय का असा सवाला आता विचारला जात आहे.
कधी राजकीय हस्तक्षेप तर कधी चिरीमिरी या जंजाळात वाहतूक विभाग अडकला आहे. खर बघता गस्त घालणे हे वाहतूक शाखेचे काम आहे. मात्र गस्त कुठं तर शहरातील रस्त्यात, मग बाहेरच्या रस्त्याचे काय? बाहेरून येणाऱ्या रस्त्यावर बाईकस्वारांची पैज लागते. ते ही संध्याकाळी. मग वाहतूक विभाग संध्याकाळी कर्तव्यावर नसतो का ? याबाबत वारंवार प्रसार माध्यमातून आवाज उठवण्यात आला आहे. मात्र त्याकडे या विभागाने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले आहे.
लायन्स कॉन्व्हेंट मध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम होता. दिवंगत सौ रुपाली प्रमोद वासेकर ह्या उत्साहपोटी लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघायला गेल्या होत्या. मग त्यांना उत्साह नडला अस म्हणायचं की बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यात वाहतूक शाखा फेल ठरली म्हणायचे? स्व.रुपाली कार्यक्रमातून घरी येताना अल्पवयीन मुलांनी मुजोरी करीत त्यांच्या गाडीला धक्का देऊन त्यांना पडल्याची चर्चा आहे. मग या लहान मुलांवर पालकांचे नियंत्रण नाही की संस्कार? सुसाट वाहन चालवून आपला व इतरांचा जीव गमवायला बसलेल्या या सुसाट पोरावर अंकुश कोण लावणार हाच प्रश्न उपस्थित होतो.
मुलांनी धक्का दिल्याने स्व.रुपालीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तस्त्राव मोठया प्रमाणात झाला आणि त्यांना प्राण गमवावे लागले. इतकेच नव्हे सध्या बायपास रोडवर ट्रान्सपोर्ट धारकांचे ट्रक रांगा लावून उभे असतात. अन ते ही विरुद्ध दिशेला. जणू काही रस्त्याचा महसूल फक्त ट्रक धारकच देतात की काय? याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष आहेच. याला कोणते कारण आहे हे त्यांनाच माहिती.
तरीसुद्धा वणीच्या वाहतूक शाखेच्या व राजकीय हस्तक्षेपात मात्र सामान्य माणूस भरडतोय अन स्व. रुपाली सारख्याना प्राण गमवावे लागतात. रूपाली वासेकर यांना दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला व त्यांच्या कुटुंबियांवर संकट कोसळले. रुपाली ताईना भावपूर्ण आदरांजली. मात्र वाहतूक शाखेने माया गोळा करण्याचा नाद सोडून जनतेच्या व्यथा जाणून त्यावर अमल केला तर वणीच्या बेलगाम वाहतुकीला आळा बसून अनेकांचे प्राण वाचेल हे निश्चित…