स्वा.सावरकर गौरव यात्रा वणीत 5 एप्रिलला

जितेंद्र कोठारी, वणी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सावरकर यांचा वारंवार होत असलेला अपमानाचा प्रखर विरोध करण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे 5 एप्रिलला वणी शहरात स्वा. सावरकर गौरव यात्रेचे आयोजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.

दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावरून ‘होय मी सावरकर’ अशी टोपी घालून या गौरव यात्रेची सुरुवात होणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील साधू, संत, ह.भ.प. मंडळी, सर्वसामाजातील सामाजिक संघटना, संस्था व व्यावसायिक संघटना या गौरव यात्रेत सहभागी होणार आहे. अशी माहिती वणी विधानसभा क्षेत्रातील भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शनिवार 1 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

गौरव यात्रेत स्वा. सावरकरांच्या प्रतिमेचा एक रथ राहणार असून या यात्रेत सावरकरांच्या आयुष्यावरील देखावे राहणार आहे. पाण्याच्या टाकीपासून ते टिळक चौक, संभाजी चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, स्वा. सावरकर चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक ते टिळक चौकात येऊन या गौरव यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रा समारोप प्रसंगी नागपूर येथील दयाशंकर तिवारी यांचे स्वा. सावरकर यांचे जीवनावर व्याख्यान होणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व सावरकर प्रेमींनी या स्वा. सावरकर गौरव यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.

Comments are closed.