सिमेंट कंपनी कडून बाधित शेतकऱ्याला मिळाली नुकसान भरपाई

जितेंद्र कोठारी, वणी : मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या खाण प्रकल्पात अनियंत्रित स्फोटामुळे प्रकल्प लगत शेतात बोअरवेल निकामी झाला होता. नुकसान भरपाईस नकार देणाऱ्या सिमेंट कंपनीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तब्बल साडे तीन वर्षानंतर पिडीत शेतकऱ्याच्या शेतात मोटरसह नवीन बोअरवेल खोदून चालू करून देण्यात आला.

मुकुटबन येथील शेतकरी संजय आसुटकर यांचे पिंपरडवाडी शिवारात शेत आहे. शेतातून काही अंतरावर आरसीसीपीएल कंपनीचे खाण प्रकल्प आहे. खाणीमध्ये केलेल्या ब्लास्टिंगमुळे वर्ष 2020 मध्ये संजय आसुटकर यांच्या शेतातील बोअरवेलमधील सबमर्शिबल मोटर व पाइपलाइन सर्व जमिनीत गाडल्या गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची मागणी धुडकावून लावली.

पिडीत शेतकऱ्यांनी मार्की येथील प्रगतिशील शेतकरी व शेतकरी नेता वासुदेव विधाते यांना हकीकत सांगून मदतीची मागणी केली. वासुदेव विधाते यांच्या मार्गदर्शनात पिडीत शेतकरी संजय आसुटकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्याच्या तक्रारीला तब्बल साडे तीन वर्षानंतर यश आले. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याच्या शेतात नवीन बोअरवेल खोदून देण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अखेर कंपनीने शेतकरी संजय आसुटकर यांच्या शेतात नवीन बोअरवेल खोदून त्यात मोटरपंप टाकून पाणी प्रवाह सुरु करुन दिले.

Comments are closed.