बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील जैन लेआउटमधील तरुण प्रणय संजय गोखरे (22) या तरुणाने बुधवारी सकाळी पाटाळ्याच्या पुलावरून वर्धा नदीत उडी घेतल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली होती. तेव्हापासून प्रणयचा शोध सुरु होता. अखेर तिस-या दिवशी आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास नायगाव ते घुग्घुस दरम्यानच्या नदीपात्रात स्थानिक रहिवाशांना प्रणयचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती पोलीस पथकाला व प्रणयच्या कुटुंबीयांना दिली. तर दुसरीकडे बचाव पथक देखील बोटीच्या साहाय्याने नदी पात्रात गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते.
प्रणय हा शिक्षण घेत होता, बुधवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी तो सकाळी 9 वाजता रागाच्या भरात घरातून निघून गेला होता. त्याच्या कुटुंबीयांनी मित्रांना माहिती दिल्यावर मित्र व कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. दरम्यान पाटाळ्याच्या पुलाजवळ त्याची दुचाकी आढळल्यानंतर पुलावरील सीसीटीव्ही चेक करण्यात आले होते. स. 10:01 वाजता त्याने उडी घेतल्याचे सीसीटीव्हीत नोंदवले गेले. घटनेच्या दिवशी स्थानिक पोलीस पथक व महसूल पथकाने शोधमोहीम राबवली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस बचाव पथक शोधमोहीमेसाठी आले.
गुरुवारी सकाळपासून जिल्हा पोलीस बचाव पथकाचे जवान बोटीच्या साहाय्याने शोध घेण्यासाठी नदीत उतरले. सायंकाळपर्यंत हा शोध सुरू होता. मात्र प्रणयचा काही पत्ता लागला नाही. आज शुक्रवारी दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा बचाव पथकाने शोधकार्य सुरु केले. दरम्यान नायगाव ते घुग्घुस नदीपात्रात परिसरातील नागरिकांना एक मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळला. याची माहिती तातडीने प्रणयच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
माहिती मिळताच प्रणयचे कुटुंबीय, मित्रपरिवार व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सदर मृतदेह प्रणयाचा असल्याची ओळख पटली. वृत्त लिहेपर्यंत प्रणयचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.



Comments are closed.