चक्क शासनाच्या जागेवर खोदली बोअरवेल, रेस्टॉरन्ट चालकाचा प्रताप

विवेक तोटेवार, वणी: वरोरा रोडचे बांधकाम सुरू आहे. हा संपूर्ण रस्ता हा सिमेंटचा बनविण्यात येत आहे. सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाल्या बांधण्याचेही काम जोमात सुरू आहे. या नालीच्या जागेतच एका बार मालकाने बोअरवेल खोदण्याचा पराक्रम केला आहे. रस्त्याच्या कामात येणारे हे बांधकाम काढण्याऐवजी हा बोअर वाचविण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत आहे. सध्या हा बोअरवेल वाचवून त्याच्या वरून नालीचे काम सुरू आहे. काही सुजाण नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला आहे. त्यांनी याबाबद आवाज उठवून हे अनधिकृत बांधकाम तात्काळ काढावे अशी मागणी केली आहे.

सध्या चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते वरोरा रोडवरील रेल्वे क्रॉसिंग पर्यत रस्त्याचे काँक्रेटिकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण नगर पालिकेने काढून टाकले. वरोरा रोडवर आशीर्वाद नामक एका बारने रस्त्यावरील जागेवर बोअरवेल मारून त्याद्वारे बारमध्ये कनेक्शन घेतले आहे. नियमाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर असलेला हा बोअर हटविण्याची गरज होती. मात्र बांधकाम विभागाने व ठेकेदाराने एक अनोखी शक्कल लढवत बोअरमधून निघणाऱ्या पाईपच्या वरून नालीचे बांधकाम सुरू केले आहे.

रस्त्याच्या बांधकामासाठी फुटपाथवरील अनेक दुकाने हटवण्यात आली. त्यांचे अतिक्रमण हटवताना त्यांना कोणतीही सवलत दिली गेली नाही. मात्र एका बारला ही सवलत का दिली जात आहे. असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर काही कालावधीनंतर या बोअरमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करण्याकरिता बांधकाम विभागाची नालीच फोडावी लागेल. या कामामागे कुणाचा कुणाला ‘आशीर्वाद’ मिळाला आहे याची सध्या चांगलीच चर्चा परिसरात रंगत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.