जितेंद्र कोठारी, वणी: विष पिऊन आत्महत्या केल्या प्रकऱणी दोघांवर शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील डोर्ली येथे 9 मे 2020 रोजी एका 50 वर्षीय शेतक-याने आत्महत्या केली होती. या प्रकरणी तब्बल एक वर्षांनी आरोपी सुरेश काशिनाथ उरकुडे (48) रा. डोर्ली व आरोपी संजय रामदास खाडे रा. कृष्णानपूर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की मृतक अनंता गुडेकर (50) हे डोर्ली येथील रहिवाशी होते. त्यांच्याकडे 4 एकर शेती होती. या शेतीवरच ते त्यांच्या कुटुबीयांचा उदरनिर्वाह करायचे. अनंत यांनी आरोपी सुरेश काशिनाथ उरकुडे व आरोपी संजय रामदास खाडे यांच्याकडून शेती गहाण ठेवून काही पैसे उधार घेतले होते. दरम्यान अनंता यांना पैसे परत करता आले नाही. त्यामुळे आरोपींनी अनंतची जमीन स्वत:च्या नावे करून घेतली.
सदर जमीन मृतक अनंता हेच वाहत होते. त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र जमीन दुस-याच्या नावे झाल्याने आरोपींनी मृतकाच्या मागे जमिनीचा ताबा सोडण्यास तगादा लावला. यावरून अनंता हे मानसिक तणावात होते. त्यांनी शेती परत करण्याचे आर्जव केले मात्र आरोपींनी तात्काळ शेतीवरचा ताबा सोडण्यास सांगितले. यातून आलेल्या मानसिक तणावातून अनंत यांनी 9 मे 2020 रोजी विषारी द्रव्य प्राषण करून आपली जीवनयात्रा संपवली.
पतीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मृतकाच्या पत्नी पुष्पा गुडेकर या खचल्या. पतीला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मात्र आरोपींनी शेती परत कऱण्याचे आश्वासन दिले. पण वर्ष झाले तरी आरोपी शेती मुळ मालक असलेल्या मृतकाच्या पत्नीच्या नावे करण्यास ते तयार नव्हते. मृतकाच्या पत्नी तक्रार देण्याचा निर्णय घेतला असता आरोपींनी त्यांना शेती परत हवी असेल तर तक्रार देऊ नको. तसेच तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप मृतकाच्या पत्नीचा आहे.
अखेर या प्रकरणी पुष्पाबाई यांनी दोन्ही आरोपींविरोधात शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी सुरेश काशिनाथ उरकुडे (48) रा. डोर्ली व आरोपी संजय रामदास खाडे रा. कृष्णानपूर यांच्या विरोधात भादंविच्या कलम 306, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सचिन लुले करीत आहे.
हे देखील वाचा: