वाहतुकीचे नियम मोडतोय दुसराच, चालान येतेय वणीच्या शिक्षकाला

एकाच नंबरच्या दोन दुचाकी? करंजी पोलिसांचा अजब कारभार

तालुका प्रतिनिधी, वणी: वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांना दंड भरावा लागतो. मात्र, तुम्ही जर एखाद्या मार्गाने दुचाकीने गेलाच नसेल. अन् तुम्हाला वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पोलिसांकडून ई-चालान आले तर? काहीसा असाच प्रकार एका शिक्षकाशी घडला आहे. विशेष म्हणजे एकाच नंबरच्या दोन दुचाकी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे पोलिसांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

वणी (लालगुडा) येथील झिलपिलवार ले आऊट मध्ये वास्तव्यास असलेले दिवाकर नरुले हे ग्रामीण विद्यालय, परमडोह येथे शिक्षक आहे. त्यांच्याकडे पॅशन-प्रो क्र. MH 29 BB 4880 क्रमांकाची दुचाकी आहे. 10 फेब्रुवारी आणि 28 एप्रिल 2023 ला हेल्मेट न वापरता करंजी ते पांढरकवडा मार्गाने दुचाकी चालवून वाहतुकीच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी नरुले यांना देय रक्कम एक हजारांची चालान पोलिसांनी पाठवली आहे.

मात्र, चार वर्षांपासून त्यांनी सदर मार्गाने दुचाकीने प्रवास केलाच नसल्याचे त्यांनी ‘वणीबहुगुणी’ला सांगितले. सदर शिक्षकांनी मोबाईल ऍपवर तपासणी केली असता पोलिसांच्या कॅमेरात टिपलेली दुचाकीचालक व्यक्ती अन्य कुणीतरी असून स्प्लेन्डर- प्लस क्र. MH29 BB 4880 क्रमांकाची दुचाकी आहे. दोन्ही गाडीवरील क्रमांक हा सारखाच आहे. पोलिसांची ऑनलाईन दंड आकारणी नरुले यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.

हे देखील वाचा:

कटू आठवणी: बाजार समिती गोळीबार प्रकरणाला आज 17 वर्षे पूर्ण

Comments are closed.