बहुगुणी डेस्क, वणी: शेतातील मोटार पंपावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद अखेर रक्तरंजित हाणामारीपर्यंत पोहोचला. शेतातील मोटार पंप काढून नेल्याच्या रागातून एका व्यक्तीने सख्ख्या बहिणीच्या घरी जाऊन तिच्या पतीवर गोट्याने हल्ला केला. ही घटना झरी तालुक्यातील माथार्जुन येथे घडली. या प्रकरणी पाटण पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी चंदा तुळशिराम सरवरे (वय 40) या माथार्जुन येथील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांनी 5 एकर शेती त्यांच्या नावावर केली आहे. तर त्यांच्या आईच्या नावावर 6 एकर शेती आहे. ही शेती फिर्यादीच्या आईला फिर्यादीच्या भावाच्या मुलाच्या नावे करायची आहे. या शेतात चंदा यांनी स्वतःच्या खर्चाने बोअर व मोटार पंप बसविला होता. या शेतातील पाण्यावरून फिर्यादी आणि त्यांचा भाऊ नंदू सूर्यभान टेकाम यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता.
आरोपीने आईच्या शेताला कापसाच्या पिकासाठी पाणी देण्यास नकार दिल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर 26 जून रोजी फिर्यादींचा मुलगा राहुल याने जेसीबीच्या सहाय्याने आईच्या शेतातील मोटार पंप काढून आणला.
गोट्याने केला हल्ला
दुसऱ्या दिवशी 27 जून रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजता फिर्यादी आणि त्यांचे पती तुळशिराम सरवरे घरासमोर उभे असताना आरोपी नंदू सूर्यभान टेकाम तेथे आला. मोटार पंप का काढला, असा जाब विचारत त्याने घरासमोरील फरशा फेकून दिल्या. त्यानंतर जवळच पडलेला गोटा उचलून फिर्यादींचे पती तुळशिराम यांच्या कानाजवळ डोक्यावर जोरात मारला. या हल्ल्यात तुळशिराम सरवरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. ते खाली पडल्याने डाव्या डोळ्याखालीही जखम झाली. घटनेनंतर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जखमींना तातडीने माथार्जुन येथील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी नंदू सूर्यभान टेकाम (वय 45, रा. माथार्जुन) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Comments are closed.