तेजापूर, दिग्रस बंधाऱ्यांना मंजुरीचा मार्ग मोकळा; ₹9.86 कोटींची मान्यता

आमदार संजय देरकर यांच्या पाठपुराव्याला यश; 5,248 हेक्टर सिंचनाचे नियोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार संजय देरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वणी तालुक्यातील तेजापूर उच्च पातळी बंधारा आणि झरी-जामणी तालुक्यातील दिग्रस आंतरराज्यीय उच्च पातळी बंधारा या 2 महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पांच्या सर्वेक्षण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकूण ₹9 कोटी 86 लाख 45 हजार 617 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने 27 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.

वणी तालुक्यातील तेजापूर गावाजवळ पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारा प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 20 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, प्रस्तावित उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून एकूण 3,049 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ₹4 कोटी 88 लाख 38 हजार 464 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

झरी-जामणी तालुक्यातील दिग्रस येथे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या संयुक्त सहभागातून पैनगंगा नदीवर आंतरराज्यीय उच्च पातळी बंधारा प्रस्तावित आहे. या प्रकल्पात महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांचा पाणीवाटपाचा हिस्सा 70:30 निश्चित करण्यात आला असून, महाराष्ट्राच्या वाट्याला 16.69 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. या पाण्याच्या वापरातून महाराष्ट्रातील 2,199 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवालासाठी ₹4 कोटी 98 लाख 7 हजार 153 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तेजापूर आणि दिग्रस या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून एकूण 5,248 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वणी आणि झरी-जामणी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता निर्माण होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

अधिवेशनापासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा
या दोन्ही सिंचन प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी आमदार संजय देरकर यांनी मागील अधिवेशनादरम्यान संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पांच्या मंजुरीसंदर्भात चर्चा केली होती. तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांची वेळोवेळी भेट घेऊन प्रकल्पांचा आढावा घेतला आणि प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शासनस्तरावर आणि विभागीय स्तरावर नियमित पाठपुरावा केल्यामुळे या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या सर्वेक्षण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेला आता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि पाण्याअभावी शेतीचे होणारे नुकसान कमी व्हावे, या उद्देशाने आमदार संजय देरकर प्रयत्नशील आहेत. तेजापूर आणि दिग्रस बंधाऱ्यांना मिळालेली प्रशासकीय मान्यता ही या प्रयत्नांची महत्त्वपूर्ण फलश्रुती मानली जात आहे. ही मान्यता प्रकल्पांच्या सर्वेक्षण, संकल्पन व DPR तयार करण्याच्या टप्प्यासाठी असून, पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामासाठी मंजुरी मिळावी, यासाठीही पाठपुरावा सुरू राहणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि शेती समृद्ध करणे, हे या प्रकल्पांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Comments are closed.