करंट लागल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू, एक बैल जखमी

शिरपूर शिवारातील घटना, शेतक-यांचे 3 लाखांचे नुकसान

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर शिवारात सोमवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक बैल हा जखमी झाला आहे. सदर बैल हे चरण्यासाठी नेत असताना रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली. यात पशुपालक उमेश बोन्डे यांचे सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले आहे.

उमेश मारोतराव बोनडे रा. शिरपूर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे 11 एकर शेती असून त्यांची पत्नी सुवर्णा बोन्डे या पोलीस पाटील आहे. त्यांच्या गावाजवळ नवेगाव रस्त्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत तार पडलेली आहे.

सोमवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास बोन्डे यांचा सालगडी बैलांना चरण्यासाठी नेत होता. दरम्यान नवेगाव रस्त्याच्या कडेला पडलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श बैलांना झाला. यात दोन बैल जागेवरच मरण पावले तर एक बैल जखमी झाला.

या दुर्घटनेत उमेश यांचे जवळपास 3 लाख रुपये इतके नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. तर विद्युत विभागाच्या म्हणण्यानुसार सकाळी पाऊस आल्याने व झाडाची फांदी लागल्याने तारेला करंट आला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

तार उचलण्यासाठी वारंवार आर्जव
ही तार उचलून घेण्यासाठी उमेश बोन्डे यांच्या पत्नी व पोलीस पाटील सुवर्णा बोन्डे यांनी अनेकदा लाइनमन व विद्युत अभियंता यांना मौखिक तक्रार केली होती. परंतु विद्युत विभागाकडून सप्लाय नसल्याचे कारण देत तार उचलले नाही. तार उचलले असते तर घटना टळली असती अशी प्रतिक्रिया सुवर्णा बोन्डे यांनी दिली.

घटनेची सूचना विद्युत विभाग व शिरपूर पोलिसांना देण्यात आली आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Comments are closed.