नंबर ब्लॉक केल्याने प्रियकराचा विवाहित प्रेयसीच्या घरासमोर राडा

सोशल मीडियावरून फोटो व्हायरल करण्याची धमकी

विवेक तोटेवार, वणी: सहा वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराचा नंबर ब्लॉक केल्याच्या कारणावरून प्रियकराने दारू पिऊन प्रेयसीच्या घरात घुसून राडा केला. तसेच सोशल मीडियावरून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घटना 25 नोव्हेंबर रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून तिला दोन मुली आहे. ती गेल्या 6 वर्षांपासून पतीपासून विभक्त झाली असून ती एका ठिकाणी भाड्याने राहते. दरम्यान तिचे चिखलगाव येथील एका व्यक्तीसोबत (40) प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र अलिकडे त्यांच्या नात्यात कुरबुरी वाढल्या. त्यामुळे प्रेयसी प्रियकराला टाळू लागली. सातत्याने प्रियकराकडून येणा-या फोनला त्रस्त होऊन प्रेयसीने प्रियकराचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.

मात्र नंबर ब्लॉक केल्याचा राग प्रियकराच्या मनात होता. तो याबाबत प्रेयसीला विचारणा करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र संपर्क होऊ न शकल्याने शनिवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी चिडलेला प्रियकर रात्री 9 वाजताच्या सुमारास दारू पिऊन प्रेयसीच्या घरासमोर गेला. त्याने घरासमोर गोंधळ घातला. तसेच प्रेयसीच्या घरात घुसून घरातील सामानाची नासधूस केली. दरम्यान पीडितेच्या मुलीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिला देखील मारहाण केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोशल मीडियावरून फोटो व्हायरल करण्याची धमकी
विवाहित महिला व आरोपी हे गेल्या 6 वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. प्रेयसीने संबंध तोडल्याचे प्रियकराला चांगलेच जिव्हारी लागले. त्याने प्रेयसीला तिचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच ज्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे प्रेयसी दहशतीत आली. अखेर तिने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

आरोपीने घरात घुसून सामानाची नासधूस केली. यात पीडितेच्या घरातील सुमारे 15 हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी प्रियकराविरोधात वणी पोलिसात भादंविच्या कलम 323, 427, 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.