बहुगुणी डेस्क, वणी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यवतमाळातील आभारसभेने कॉंग्रेसला जबर हादरा बसला. शहरातील निष्ठावंत युवा नेते बंटी ठाकूर यांनी काँग्रेसलाच ‘हात’ दाखवत गूड बाय केलं. काँग्रेसला पक्षाला त्यांनी रामराम ठोकला. शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. यवतमाळ येथील पोस्टल मैदानावर झालेल्या आभार सभेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे आले होते. त्यांच्या साक्षीनं बंटी ठाकुर यांनी धनुषबाण हाती घेत शिवसेनेत घरवापसी केली.

बंटी ठाकूर यांच्या मागे मोठ्या प्रमाणावर युवकांची फळी राहली आहे. तीच त्यांची जमेची बाजू आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले. बंटी ठाकूर यांच्या मागे असणारा युवा वर्गदेखील या निवडणुकीत भाग घेईल. शिवसेना पक्षात बंटी ठाकूर यांच्या परत येण्याने मोठा बदल अपेक्षित आहे.
पक्षाच्या बळकटीकरिता त्यांचा शिवसेनाप्रवेश महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या या निर्णयाने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, यवतमाळ जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर यांच्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत बंटी ठाकुर, अनुप खत्री, दिलीप वनकर शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात अनेकांनी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाला पसंती दिली आहे. तसेच विनोद मोहितकर यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्यात. कार्यकर्त्यांमूळे शिवसेनेला उभारी मिळाली असून येत्या नगरपरिषद, जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत “भगवा फडकविणार” असल्याचे ते बोलले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे युती सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेत प्रवेशासाठी ओघ सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बंटी ठाकूर यांच्या शिवसेना पक्षात पुन्हा परत आल्याने सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
Comments are closed.