एकदाचं चंद्रावर चालणं सोपं; पण खापरी रोडवर चॅलेंजच….

केवळ अर्ध्या किलोमीटरच्या अर्धवट खापरी मार्ग दुरुस्तीची प्रतीक्षा

बहुगुणी डेस्क, वणी: एक जगप्रसिद्ध विधान आहे. जे राष्ट्र उन्नत आहे, तिथले रस्ते चांगले असतात. हे वाक्य अर्धसत्य आहे. तर जिथले रस्ते चांगले असतात, ते राष्ट्र उन्नत होतं, हे पूर्ण सत्य आहे. कालपरवाच आपला देश पुन्हा अंतरिक्षात गेला. मात्र मारेगाव तालुक्यातील बुरांडातून खापरी या मार्गावर चालणं म्हणजे एक दिव्यच आहे. एकदाचं चंद्रावर चालणं सोपं; पण या रोडवर चालणं कठीण झालं आहे. अशा तिखट प्रतिक्रिया या मार्गावरील नियमित वाटसरू देत आहेत.

कित्येक वर्षांपासून बुरांडा ते खापरी या रस्त्याचे काम पूर्ण झालेच नाही. या रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उखडली. थोडा जरी पाऊस आला तरीही मार्गावर चिखलच चिखल होतो. नागरिकांना या रस्त्याने चालताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. खापरी येथे जाण्याकरिता या मार्गाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. बुरांडा ते खापरी हा अडीच किलोमीटरचा रस्ता आहे. त्यातला केवळ दोन किमीचा रस्त्या थोडा बरा आहे. उर्वरित अर्धा किमीच्या रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाही.

आता पावसाळ्या सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाटसरुंच्या फजितीला पारावारच नाही. या रोडने वाहन तर सोडाच; पण पायी चालणंही अवघड झालं आहे. हा मार्ग जिल्हा परिषद अंतर्गत येतो. तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोन वर्षा पूर्वी हा रोड तयार झाला. त्यातल्या केवळ दोन किलोमीटरच रस्त्याचंच काम झालं आहे. उर्वरित अर्ध्या किलोमीटरचा रस्ता ‘अच्छे दिन’ची वाट पाहत आहे.

उखडलेल्या रस्त्याने अनेकांच्या गाड्या, सायकली पंक्चर होत आहेत. चार चाकी वाहन गावात आणणं जवळपास अशक्यच. एखाद्याच्या आजाराची तीव्र समस्या आली तर विचारणेच नको. ‘उपचार नकोत; पण रस्ता आवर’ असंच म्हणावं लागतं. इथून अनेक विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जातात. त्यांची ससेहोलपट अजूनही थांबली नाही.

रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हा प्रश्न या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना पडतो. गेल्या तीन वर्षांत नागरिकांनी या रस्त्यासंदर्भात आपली फिर्याद संबंधित अधिकाऱ्यांकडे कितीतरी वेळा मांडली. हा रोड मंजुरी करता टाकण्यात आला आहे. अशाच उडवाउडवीच्या उत्तरांपलीकडे काहीच मिळालं नाही. रस्त्याच्या मंजुरीसाठी तीन तीन वर्षं लागतात काय? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. तेव्हा लवकरात लवकर उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्ता तयार करण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.